भिवापूर/चिचाळा : पाहमी येथे लग्न समारंभात जेवणाच्या पंगतीमध्ये झालेल्या वादावादीत मारहाण झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी फिर्यादी अनिल नथ्थूजी पिल्लेवान यांच्या तक्रारीवरून आरोपी ठरलेल्या बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. वामन गोविंदा डहाके (५४), सचिन वामन डहाके (३४), समीर वामन डहाके (२२), सर्व रा. पाहमी (चिचाळा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीविरुद्ध ३०२, ३२४, ४२७, ३४ व अनु. जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१५ कलम ३(२) (व्ही.ए.) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहमी येथील पंजाब पिल्लेवान यांच्या मुलीचा वडधामना, नागपूर येथील विशाल भारशंकर याच्याशी रविवारी विवाह आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी वर मंडळीचे नातेवाईक व मित्रमंडळी पाहमी येथे आले होते. फिर्यादीच्या तक्रारीनुसार लग्न लागल्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास यातील आरोपी सचिन हा पंगतीमध्ये जेवण करायला बसला होता. दरम्यान धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपी व वर मंडळीतील काहींशी त्याचा वाद झाला. यावेळी ग्रामस्थांनी हा वाद सोडवून सचिनला घरी पाठविले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपी सचिन हा त्याचे वडील वामन व भाऊ समीर यास लग्नस्थळी घेऊन आला. त्यानंतर दुपारचे भांडण पुन्हा उकरून काढत, आरोपी असलेल्या तिन्ही बापलेकांनी वर मंडळीकडील लोकांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात मृतक आश्विन नरेश टेंभरे (३५), रा. वडधामना व आशिष रमेश बोंदरे, दीपक चंदू राऊत, रा. नागपूर हे तिघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान वर मुलाकडील नातेवाईक जखमींना उमरेड रुग्णालयात घेऊन जात असताना आरोपींनी पुन्हा त्यांचे वाहन थांबवीत काचा फोडल्या. त्यानंतर जखमींना उमरेड येथे रुग्णालयात व नंतर नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, यातील आश्विनचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे करीत आहेत.
घटनास्थळाची पोलिसांकडून पाहणी
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर, सहायक निरीक्षक शरद भस्मे यांनी रविवारी रात्री घटनास्थळी दाखल होत पाहणी केली होती. यातील आरोपी असलेले तिन्ही बापलेक जखमी असल्याने त्यांना भिवापूर येथे आणण्यात आले. त्यानंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सोमवारी सकाळी पुन्हा ठाणेदार भोरटेकर पोलीस कर्मचाऱ्यासह पाहमी येथील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘ऑन दी स्पॉट’ पाहणी करत, काही बाबी अधोरेखित केल्या.
२५ मार्चपर्यंत पीसीआर
तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर सोमवारी त्यांना नागपूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान त्यांना २५ मार्चपर्यंत पीसीआर देण्यात आला. शुल्लक कारणामुळे झालेल्या या हाणामारीत एकाचा नाहक बळी गेल्याने खंत व्यक्त होत आहे.