नागपूर - मुंबईच्या ड्रग तस्करांशी कनेक्ट असलेल्या एका महिला ड्रग तस्करासह तिघांना गुन्हे शाखेच्या एनडीपीएसने सोमवारी सकाळी अटक केली. संगीता राजेंद्र महेश्वरी (वय ४१, रा. अयोध्यानगर), शिवशंकर चंद्रभान कांद्रीकर (वय ३४) आणि आकाश चंद्रकांत ढेकळे (वय ३७, रा. एमआयजी कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
संगीता गेल्या अनेक दिवसांपासून एमडीची तस्करी आणि विक्री करते. साथीदारासह स्वता मुंबईला जाऊन तेथील तस्करांकडून एमडी खरेदी करते आणि येथे आणून विक्री करते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यापासून एनडीपीएसचे पथक तिच्या मागावर होते. ती दोन दिवसांपूर्वी मुंबईला गेली आणि तेथून ५ लाख, ७० हजारांची ५७ ग्राम एमडी घेऊन दुरांतोने नागपुरात परतणार असल्याचे कळताच तिच्या मागावर असलेले एनडीपीएसचे पोलीस निरीक्षक मनोज सिडाम, सहायक निरीक्षक सूरज सुरोशे, सहायक निरीक्षक बद्रीनारायण तिवारी तसेच पोलीस कर्मचारी प्रमोद धोटे, प्रदीप पवार, राजेश देशमुख, नामदेव टेकाम, समाधान गिते, सुनील इंगळे, विनोद गायकवाड, विवेक अढावू, नितीन मिश्रा, अश्विन मांगे, समीर शेख, सहदेव चिखले, राहुल पाटील आणि रुबिना शेख यांनी सापळा लावला.
सोमवारी सकाळी रेल्वेस्थानकावर उतरून संगीता महेश्वरी आणि शिवशंकर कांद्रीकर संत्रा मार्केटकडून जाऊ लागले. त्यांना घेण्यासाठी आरोपी आकाश ढेकळे हा होंडा सिटी कार (एमएच ४० - बीके ३७९८) घेऊन आला होता. या तिघांनाही पोलिसांनी पकडले. त्यांची झडती घेऊन त्यांच्या ताब्यातून ५७ ग्राम मेफेड्रॉन, चार मोबाईल, १७ हजारांची रोकड आणि होंडा सिटी कार असा एकूण १६ लाख, १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली. आरोपी संगीता ही मुंबईतील ड्रग तस्करांशी कनेक्ट असून, तिच्या मुंबईतील साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. तिचा साथीदार शिवशंकर कांद्रीकर याचा एक नातेवाईक एका राजकीय पक्षात सक्रीय असल्याने या प्रकरणाच्या संबंधाने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
-----