नागपूर : घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट पाचने गजाआड करून त्यांच्या ताब्यातून ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रोहित तुषार वालदे (वय १९, रा. फ्लॅट नं. २, श्री कॉम्प्लेक्स, यादवनगर), शेख नौशाद हारुन कुरेशी (वय २०, रा. वनदेवीनगर यशोधरानगर) आणि शेख सुल्तान शेख मोहम्मद (वय २३, रा. शहंशाह चौक, उप्पलवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लकडगंज परिसरात ९ मे २०२३ रोजी सायंकाळी ७.३० ते १० मे २०२३ सकाळी ८.३० दरम्यान मोहम्मद शमीन अल्वर हुसेन (वय ५०, रा. जुनी मंगळवारी, लकडगंज) यांनी त्यांची लॉक करून ठेवलेली अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ४९, के-३७७६ अज्ञात आरोपीने चोरून नेली होती. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यासोबतच आरोपींनी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी तसेच कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लहान-मोठे अॅल्यूमिनियमचे गंज चोरल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून गंज व दोन दुचाकी असा एकुण ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, सहायक पोलिस निरीक्षक भोपाळे, आशिष कोहळे, प्रमोद वाघ, महादेव थोटे, राजुसिंग राठोड, रोनॉल्ड अॅन्थोनी, रामनरेश यादव, राजु टाकळकर, राजेंद्र टाकळीकर, सुशिल गवई, निखील जामगडे यांनी केली.