लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आनंद साई अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीतील चार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपी मिलिंद नारायण घोगरे (वय ४४, रा. अयोध्यानगर), तेजस ऐसाजी कोहक (वय २४) आणि गजानन रघुनाथ नंदनवार (वय ६०, रा. श्रीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा चौकात आनंद साई क्रेडिट को-ऑप. सोसायटी आहे. या सोसायटीत गुंतवणूकदारांनी ठेवलेली चार कोटी आठ लाखाची रोकड उपरोक्त आरोपींनी संगनमत करून भंडाऱ्यात जमीन घेतल्याच्या नावाखाली दक्षायणी ग्रुप नामक संस्थेला गाळे बांधण्याकरिता दिली. हे गाळे विकून संस्थेला अर्थात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा लाभ मिळणार असे आरोपींनी सांगितले. प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. आरोपींच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांचा विश्वासघात करून या रकमेचा अपहार केला. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत हा घोटाळा झाला. संस्थेच्या अंकेक्षणात तो उघड झाला. दरम्यान, सोसायटीच्या सभासदांनी फसवणुकीची तक्रार नोंदविल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली. चौकशीत घोटाळ्याचे अनेक पुरावे मिळाल्यानंतर लेखा परीक्षक अशोक लालसिंग राठोड यांनी सोमवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हवालदार मीना उमाळे यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी घोगरे, कोहक आणि नंदनवार या तिघांना लगेच अटक करण्यात आली. घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत.
---