नागपूर : मनात जिद्द घेऊन विदर्भातील तीन बाइकर्स यंदा पुन्हा पाचव्यांदा प्रवासाला निघाले आहेत. थंडी, वारा अंगावर झेलत दरवर्षी नव्या प्रदेशाच्या शोधात निघणाऱ्या या तिघांचा २० दिवसांचा ५,४०० किलोमीटरचा प्रवास रविवारी नागपुरातून सकाळी सुरू झाला आहे.
प्रशांत कावडे, सतीश मसराम आणि सचिन रामटेके अशी या साहसी युवकांची नावे आहेत. प्रशांत हे नागपूरचे असून, खासगी ट्युशन क्लासेस घेतात. सतीश अमरावतीचे असून, एलआयसी अभिकर्ता म्हणून काम करतात, तर सचिन निवृत्त आर्मी जवान असून गडचिरोलीला राहतात. ४० ते ४५ वर्षे वय असलेल्या या तीन मित्रांनी २०१७ पासून बाइकने भ्रमण करण्याची कल्पना अंमलात आणली. सकाळी रेशिमबाम चौकातून प्रशांत कावडे, सतीश मसराम यांनी प्रवासाला प्रारंभ केला, तर सचिन रामटेके राजनगाव-रायपूर दरम्यान मार्गात या प्रवासात सामील झाले. या २० दिवसांच्या प्रवासात बिलासपूर, गया (बिहार), सिलीगुडी (प. पंगाल), नाथूला पास (सिक्कीम : भारत-चीन सीमा), गंगटोक, तेजपूर (अरुणाचल प्रदेश) आणि तवांग सेलपास (अरुणाचल प्रदेश) या ठिकाणी ते जाणार आहेत. परवानगी मिळाल्यास सेलपासच्या पुढेही जाण्याचा त्यांचा मानस आहे.
आपल्या या साहसी मोहिमेबद्दल ‘लोकमत’शी बोलताना प्रशांत कावडे म्हणाले, २०१७ मध्ये मित्रांच्या डोक्यात ही कल्पना आली. लेह-लडाखला जाण्याचे ठरले. त्यानुसार १० जून २०१७ ला २१ दिवसांचा पहिला सुरू प्रवास केला. २०१८ मध्ये प्रवासाचा दुसरा टप्पा भुतानचा पार पाडला. नंतर २०१९ मध्ये ४,२०० किलोमीटरचा नेपाळ प्रवास केला. २०२० मध्ये कोरोनामुळे जाता आले नाही. २०२१ मध्ये स्प्रिटी व्हॅली-लद्दाखचा प्रवास पूर्ण केला. आता ही पाचवी राइड्स आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार
स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने मार्गातील देशवासीयांना राष्ट्रीय एकात्मतेचा आणि देशभक्तीचा संदेश आपण देणार असल्याने प्रशांत कावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आपल्या दुचाकीवर वाऱ्यासोबत फडकणारा देशाचा राष्ट्रध्वज आपणास प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. हा प्रवास खडतर असला तरी स्वप्नपूर्तीचा आनंद देणारा आहे. त्यातून युवकांना प्रेरणा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.