लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांधकामाचे पैसे न देता मारहाण केल्यामुळे एका ठेकेदाराने गळफास लावून आत्महत्या केली. चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर जरीपटका पोलिसांनी वीरेश मधुकर राऊत (नागराज नगर), नूतन उर्फ उर्मिला हेमराज वासनिक (न्यू इंदोरा) आणि संघदिप उर्फ आलाप वासुदेव बनसोड (सुजाता नगर) या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
न्यू इंदोरा, बाराखोली येथे राहणारे राजेश खांडेकर (वय ५२) हे बांधकामाचे छोटे-मोठे ठेके घेत होते. आरोपींचे त्यांनी काम करून दिले होते. मात्र राजेशच्या हिशेबाप्रमाणे आरोपींनी पैसे दिले नाही. उलट त्यांना चार शिव्या घालत मारहाण केली होती. त्यामुळे २१ एप्रिलला सकाळी राजेश यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती.
या प्रकरणात जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान २० दिवसांच्या तपासात राजेश यांच्या आत्महत्येला आरोपींनी पैशाच्या देवाण घेवाण वरून केलेला वाद आणि शिवीगाळ करून त्यांना केलेली मारहाण कारणीभूत असल्याचे पुढे आले. या कारणामुळेच राजेशने आत्महत्या केल्याची तक्रार राजेशची पत्नी सपना खांडेकर यांनी नोंदवली. त्यावरून आरोपी वीरेश राऊत, नूतन वासनिक आणि संदीप बनसोड या तिघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.