कामठी : घरफोडी करणाऱ्या तीन आरोपीस जेरबंद करून त्यांच्याकडून २ लाख ५८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नवीन कामठी पोलिसांना यश आले. नवीन येरखेडा येथील रहिवासी अविनाश कुमार बैद्रनाथ सिंग यांचे कुटुंब ३ एप्रिल रोजी बिहारला गेले होते. त्यांनी घराशेजारी राहणाऱ्या मीरा यादव यांना मेन गेटची किल्ली देऊन घरातील झाडाला पाणी टाकण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार मीरा यादव यांनी ९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता सिंग यांच्या घराचे मेन गेट उघडून अंगणातील झाडाला पाणी दिले. त्यावेळेस घराच्या मुख्य दरवाजास कुलूप लावून होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० एप्रिल रोजी दुपारी ११.३० वाजता मीरा यादव या सिंग यांच्या घराच्या झाडाला पाणी देण्यास गेल्या असता घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. याबाबत सिंग यांना मीरा यादव यांनी फोनवरून कळवले. ही माहिती मिळताच सिंग कुटुंब नागपूरकडे परत निघाले. २१ एप्रिल रोजी सिंग यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी जात सिंग यांच्या शेजारी राहणाऱ्या आशा अरुण वरखेडे यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या दिवशी या परिसरात एक ऑटो क्रमांक एम.एच. ४०/ २४४५ संशयास्पदरीत्या दिसून आला. त्या आधारावर तपास करीत पोलिसांनी आरोपी नवीन मिलींद बरसे (२०) रा. नवीन येरखेडा, दुर्गा सोसायटी, फैजान वकील अहमद (१८) रा. मोमीनपुरा आणि संजोग लीलाधर होले (२२) रा. टिमकी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेला मुद्देमाल हस्तगत केला. यातील दोन इतर आरोपी आकाश व मुनीर हे फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय मालचे, दुय्यम पोलीस निरीक्षक काळे, सहायक पोलीस निरीक्षक कन्नाके, पोलीस शिपाई मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, संदीप गुप्ता, सुरेंद्र शेंडे, उपेंद्र आकोटकर यांनी केली.
घरफोडी करणारे तीन आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:12 AM