लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : शहरात चाेरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यांनी एकाच रात्री तीन घरफाेड्या व मंदिरात चाेरी करीत एकूण ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. या घटना मंगळवारी मध्यरात्री घडल्या असून, बुधवारी सकाळी उघड झाल्या.
धम्मदीप शामराव गणवीर (३५, रा. खेडेपार, ता. लाखनी, जिल्हा भंडारा) हे माैदा शहरातील शिवनगरात राहतात. ते कुटुंबीयांसह त्यांच्या मूळ गावी गेले हाेते. त्यामुळे घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने कपाटातील ३७ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने चाेरून नेल्याची माहिती त्यांनी पाेलिसांना दिली.
चाेरट्याने याच नगरातील दिनेश काळसर्पे यांच्या घरात चाेरी करीत २२ हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने चाेरून नेले तर नंतर त्यांनी दिनेश काळसर्पे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या ज्ञानीवंत वैद्य यांच्या घरात हात साफ करीत १३ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
घटनेच्यावेळी दिनेश काळसर्पे व ज्ञानीवंत वैद्य तसेच त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. चाेरीच्या या तिन्ही घटना बुधवारी सकाळी उघड झाल्याने संबंधितांनी पाेलिसात तक्रारी दाखल केल्या. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनांचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनेकर करीत आहेत.
...
मंदिरातील दानपेटी फाेडली
चाेरट्याने याच रात्री माैदा शहरातील नर्मदेश्वर शिव मंदिर व हनुमान मंदिरात प्रवेश केला व आत ठेवलेल्या दानपेटीचे कुलूप ताेडून आतील राेख रक्कम चाेरून नेली. त्या दानपेटीत दाेन हजार रुपये असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. चाेरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरात भीतीयुक्त वातावरण निर्माण हाेत आहे. त्यामुळे चाेरट्यांचा वेळीच बंदाेबस्त करण्याची मागणीही शहरातील नागरिकांनी केली आहे.