लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भासह, आजूबाजूच्या राज्यातून गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. परंतु वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. विशेषत: मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असताना व्हेन्टिलेटर २२ आहेत. यातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये ७२ खाटांच्या तुलनेत केवळ १७ व्हेन्टिलेटर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाढीव व्हेन्टिलेटरचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता, नुकतेच याला मंजुरी मिळाल्याने तीन कोटी किमतीचे २० व्हेन्टिलेटर उपलब्ध होणार आहे.रुग्ण अत्यवस्थ झाला की श्वासोच्छवास घेण्यात अडचण होते. अशावेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातो. हे काम अत्याधुनिक यंत्र व्हेन्टिलेटर करते. मेडिकलमध्ये हे यंत्र अतिदक्षता विभागात आठ, शस्त्रक्रियेच्या रिकव्हरी वॉर्डात तीन, पेडियाट्रिक विभागात दोन, मेडिसीन व सर्जरी आकस्मिक विभागात प्रत्येकी दोन तर स्वाईन फ्लू वॉर्डात पाच उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातील पाच नादुरुस्त आहेत. उर्वरित व्हेन्टिलेटर रुग्णसेवेत आहेत. व्हेन्टिलेटर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. काहींवर हाताने एक पंप दाबून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची वेळ येते. याला वैद्यकीय भाषेत ‘बॅग अॅण्ड मास्क व्हेन्टिलेशन’ असे म्हणतात. यासाठी २४ तास कुणीतरी हा पंप दाबावा लागतो. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने व्हेन्टिलेटर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. यात ट्रॉमा केअर सेंटरसाठी २० ‘अॅडल्ट’ आणि ‘पेडियाट्रिक व्हेन्टिलेटर’ होते. अखेर या यंत्र खरेदीसाठी शासनाने ३ कोटी ३८ लाख रुपयाला मंजुरी दिल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या यंत्रासोबतच १२ लाख किमतीचे २० ‘मोटराईज्ड फावलर बेड’ तर नऊ लाख किमतीचे २० ‘मल्टीपॅरा मॉनिटर’च्या खरेदीलाही मान्यता देण्यात आली आहे. लवकरच हे उपकरण रुग्णसेवेत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
नागपूरच्या ट्रॉमा केअर सेंटरला तीन कोटींचे व्हेन्टिलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:06 PM
विदर्भासह, आजूबाजूच्या राज्यातून गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या आशेने मेडिकलमध्ये येतात. परंतु वाढत्या रुग्णांच्या संख्येत उपकरणांची संख्या तोकडी असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. विशेषत: मेडिकलमध्ये खाटांची संख्या १५०० वर गेली असताना व्हेन्टिलेटर २२ आहेत. यातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये ७२ खाटांच्या तुलनेत केवळ १७ व्हेन्टिलेटर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाढीव व्हेन्टिलेटरचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता, नुकतेच याला मंजुरी मिळाल्याने तीन कोटी किमतीचे २० व्हेन्टिलेटर उपलब्ध होणार आहे.
ठळक मुद्दे२० वर यंत्रांची खरेदी ; रुग्णांना मिळणार दिलासा