लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आलेल्या बाळविक्रीच्या रॅकेटमधील आणखी एक गुन्हा समोर आला आहे. रॅकेटमधील आरोपींनी पुण्यातील गरीब दाम्पत्याला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाची गोंदियातील किराणा व्यापाऱ्याला तीन लाखांत विक्री केली होती. २०१९ मध्ये हा सौदा झाला होता व तपासादरम्यान हा प्रकार समोर आला. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने रॅकेटची सूत्रधार राजश्री सेनसह दोन महिलांना अटक केली आहे. या रॅकेटमधील आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर पोलिसांनी नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर मकोकांतर्गत कारवाई केली होती. राजश्री सेनसह पिंकी ऊर्फ सुजाता लेंडे (२८, कळमना), सचिन पाटील (इंदोरा), पंकज कोल्हे, प्रिया पाटील, छाया मेश्राम या रॅकेटमध्ये सहभागी होते.
दत्तक प्रक्रियेच्या नावाखाली उकळले पैसे गोंदियातील निपुत्रिक किराणा व्यापाऱ्याशी संपर्क करत आरोपींनी गरीब दाम्पत्याकडून बाळ घेतले. ते किराणा व्यापाऱ्याला सोपविले. दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावादेखील केला. मात्र, त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्याची भीती दाखवून व्यापाऱ्याकडून तीन लाख रुपये उकळले.