लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयची हेर असलेल्या कानपूर (उत्तर प्रदेश) मधील एका महिलेच्या माध्यमातून पाकिस्तानसह अमेरिकन गुप्तचर संस्थांना ब्रह्मोस क्षेपणास्त्र तसेच भारतीय सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती पुरविणारा निशांत अग्रवाल या हेराला एटीएसच्या पथकाने मंगळवारी न्यायालयात हजर केले. थेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने अग्रवालला तीन दिवसांचा ट्रांझिट रिमांड मंजूर केला.शास्त्रज्ञाच्या बुरख्याआड हेरगिरी करून देशद्रोह करणारा अग्रवाल मूळचा रुडकी येथील रहिवासी आहे. चार वर्षांपूर्वी तो नागपूरजवळच्या (मोहगाव-डोंगरगाव) डीआरडीओच्या ब्रह्मोस एअरोस्पेस प्लांट विभागात रुजू झाला होता. सध्या तो सिनियर सिस्टीम इंजिनिअर म्हणून नोकरी करीत होता. सोनेगाव पोलीस ठाण्याजवळ असलेल्या उज्ज्वलनगरात ५०/७ या मनोहर काळे यांच्या घरी तो भाड्याने राहायचा. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे क्षितिजा नामक तरुणीशी लग्न झाल्याचे समजते. खास सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणारी आणि कानपूर (उत्तर प्रदेश) मधील मिसेस काळे म्हणून वावरणारी फेसबुक फ्र्रेण्ड निशांतच्या संपर्कात आली. तेव्हापासून तो भारतीय लष्कर, ब्रह्मोस क्षेपणास्त्र येथील प्लांटसह ठिकठिकाणच्या संवेदनशील स्थळाची माहिती विशिष्ट कोडवर्डमध्ये पाकिस्तानी हेर असलेल्या महिलेला शेअर करीत होता. ही संवेदनशील माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अमेरिकी गुप्तचर संस्थांसाठी पाठविली जात होती. हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर उत्तर प्रदेश एटीएस आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी छापेमारी केली. कानपुरात रविवारी रात्री काळे नामक महिला पाकिस्तानी हेर ताब्यात घेतली. तिच्याकडून इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले. त्यातून निशांत अग्रवालचा कोड मिळाला. त्यामुळे यूपी एटीएस आणि मिलिटरी इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी नागपूरकडे धाव घेतली. तत्पूर्वी महाराष्ट्र एटीएस तसेच नागपूरच्या पोलीस आयुक्तांना ‘आॅपरेशन’ची माहिती देण्यात आली. सोमवारी सकाळी निशांत काम करीत असलेल्या ठिकाणी आणि तो राहात असलेल्या उज्ज्वलनगरात तपास यंत्रणांनी एकाच वेळी छापे मारले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली.निशांत वापरत असलेला संगणक, लॅपटॉप, मोबाईल तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांसह काही उपकरणेही तपास यंत्रणांनी जप्त केली. त्याला कार्यालयीन गोपनीयता कायद्यान्वये अटक करण्यात आली. त्याला गुप्त ठिकाणी नेऊन त्याची प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. न्यायालयात त्याचा ट्रांझिट रिमांड मिळवण्यात आला. त्याला पुन्हा एटीएसच्या स्थानिक कार्यालयात नेण्यात आले. तेथे त्याची प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून या भागात मोठ्या संख्येत साध्या वेषातील पोलीस फिरत होते. एटीएसच्या कार्यालयाच्या गेटजवळ उभे राहणारांनाही हुसकावून लावले जात होते. आज रात्रीच्या विमानाने निशांतला लखनौला नेण्यात येणार असल्याचे संबंधित सूत्रांकडून सांगितले जात होते.