नागपूर : गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी २४ तासात तीन मृत्यूची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. तीनपैकी दोन मृत्यू नागपूर शहरातीलच आहेत. शुक्रवारी चाचण्यांमध्येदेखील घट झाली. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच असून जिल्ह्यातील आकड्याने आठ हजारांचा टप्पा पार केला आहे.
शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण १ हजार ७३२ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यातील ३०७ रुग्ण ग्रामीण भागातील तर १ हजार ३६४ रुग्ण शहरातील असून ६१ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. गुरुवाच्या तुलनेत शुक्रवारच्या चाचण्या घटल्या. २४ तासांत ११ हजार ८४२ चाचण्या झाल्या. त्यातील ८ हजार ९३१ चाचण्या शहरात तर २ हजार ९११ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या. जिल्ह्यातील सक्रिय बाधितांचा आकडा ८ हजार ३६० वर पोहोचला आहे. त्यातील ६ हजार ८६६ रुग्ण शहरातील व १ हजार ३८८ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. बुधवारी शहरातील ५८३ रुग्णांसह एकूण ६७२ रुग्ण बरे झाले.
दोन दिवसात चार मृत्यू
शुक्रवारी झालेल्या मृत्यूपैकी एक मृत्यू शहराबाहेरील रुग्णाचा आहे. दोनच दिवसात चार मृत्यू झाले असून मृत्यूची एकूण संख्या १० हजार १२८ वर पोहोचली. ग्रामीणमध्ये २ हजार ६०४ आणि शहरात ५ हजार ८९७ मृत्यूची नोंद झाली.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ४ हजार ६३७ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील ३ लाख ४९ हजार ३६७ रुग्ण शहरातील, १ लाख ४७ हजार ८९७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.