लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : परिसरातील गावांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. आठवडाभरात महादुला येथील दाेन तर नांदा (नवीन) येथील एक असे डेंग्यूचे तीन रुग्ण उपचारादरम्यान दगावले आहेत. आराेग्य विभागाने याची दखल घेतली असली तरी महादुला नगर पंचायत व नांदा ग्रामपंचायत प्रशासनाने प्रतिबंधक उपाययाेजना करायला अद्यापही सुरुवात केली नाही.
सरस्वती कुंभारे, रा. श्रीवासनगर, महादुला, ता. कामठी या महिलेचा रविवारी (दि. २२) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली असून, आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी त्याला दुजाेरा दिला हाेता. त्यांच्यावर दाेन दिवसांपासून खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू हाेते, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
याच आठवड्यात करिष्मा चिचमलकर, रा. धुडस लेआऊट, महादुला, ता. कामठी या तरुणीचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदा (नवीन) येथील एका रुग्णाचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली असून, त्याला आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. मात्र, त्या मृताचे नाव कळू शकले नाही.
महादुला परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या माेठी आहे. बहुतांश रुग्ण खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. काहींचा खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्ण व मृतांची संख्या माेठी असून, खासगी हाॅस्पिटलमुळे मूळ आकडे कळत नसल्याचे काही जाणकार व्यक्तींनी सांगितले.
...
२२ रुग्णांची नाेंद
महादुला, नांदा (नवीन) ही गावे गुमथी (ता. कामठी) प्राथमिक आराेग्य केंद्राच्या हद्दीत येतात. महादुला येथे डेंग्यूचा रुग्ण आढळून येताच आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हद्दीतील गावांमध्ये तातडीने सर्वेक्षण करायला सुरुवात केली. यात डेंग्यूच्या २२ रुग्णांनी नाेंद करण्यात आली, अशी माहिती प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राऊत यांनी दिली. या गावांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची धूरळणी करण्याच्या सूचना नगर पंचायत व ग्रामपंचायतींना दिल्या असल्याचे डाॅ. राऊत यांनी सांगितले. नागरिकांनी घर व घराचा परिसर स्वच्छ व काेरडा ठेवावा तसेच आठवड्यातील एक दिवस काेरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.