मेयो : वसतिगृह परिसरात जागोजागी पावसाचे पाणी साचूननागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) तीन निवासी डॉक्टरांना डेंग्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या परिसरात जागोजागी पावसाचे पाणी साचून असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय उघडा नाला, गटारीमुळे डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या अभावाने मेयो रुग्णालय सफाईला घेऊन अडचणीत आले आहे. बाह्यरुग्ण विभागात तर दुपारी १० वाजतानंतर स्वच्छतागृहाची दुर्गंधी पसरलेली असते. विशेषत: स्त्री रोग विभागात रुग्णाला तोंडाला रुमाल बांधून उभे रहावे लागते. अशीच स्थिती रुग्णालयाच्या इतरही ठिकाणी आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांनाही आता याचा फटका बसत आहे. वसतिगृहाच्या सफाईला घेऊन अनेकवेळा तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याचे निवासी डॉक्टर सांगतात. यामुळे खुद्द डॉक्टरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून वसतिगृहाच्या परिसरात पावसाच्या पाण्याचे डबके साचून आहे. या शिवाय उघड्या गटारी व परिसरातील गेलेल्या नाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळेच तीन डॉक्टरांना डेंग्यू झाला असावा, असे बोलले जात आहे. रुग्णालय प्रशासनाला याची गुरुवारी माहिती मिळताच शुक्रवारपासून स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
तीन डॉक्टरांना डेंग्यूचा डंख
By admin | Published: September 04, 2015 2:44 AM