नागपूर :
घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक ‘ब्रेन डेड’ने त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या प्रसंगातही आपल्या व्यक्तीला अवयवरुपी जिवंत ठेवण्यासाठी कुटुंबियांनी पुढाकार घेतला. त्यांच्या यकृत व दोन्ही मूत्रपिंडाच्या अवयदानामुळे तीन रुग्णांना नवीन जीवनाची संजीवनी मिळाली. त्या कुटुंबाच्या अवयवदानाने तीन कुटुंबियांची दिवाळी गोड झाली. उदय पराते (४८) रा.सहकार नगर, मौदा असे अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, पराते हे एका खासगी कंपनीमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. त्यांना पत्नी वैशाली (३७ ) मुलगा पृथ्वीराज (१६) मुलगी श्रिया (१३) आहेत. उदय हे आपले नातेवाईक आणि मित्र परिवारांना दिवाळी निमित्य भेट वस्तू देण्याकरिता गेले होते. परंतु अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि लगेच त्यांना ‘सेंट्रल इंडिया कार्डिओलॉजी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती न्यूरोलॉजिकलदृष्ट्या खालावली आणि डॉक्टरांच्या टीमने त्यांना मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित केले.
हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील वाशीमकर यांनी नातेवाईकांना अवयव दानाविषयी माहिती दिली. त्यांचे भाऊ रामप्रसाद पराते आणि पत्नी वैशाली पराते यांनी अवयवदानास संमती दिली. याची माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीनीने लगेच रुग्णाला सरस्वती हॉस्पिटल मध्ये दाखल केले आणि पुढील प्रक्रिया सुरु केली. ‘झेडटीसीसी’ने प्रतीक्षा यादी तपासून कुटुंबाने मंजुरी दिलेले अवयव दान केले. यकृत अॅलेक्सिस हॉस्पिटलच्या ६२ वर्षीय पुरुष रुग्णाला, एक मूत्रपिंड एसएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरे मूत्रपिंड आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) वर्धा येथील ४९ वर्षीय पुरुष रुग्णाला दान करण्यात आले. बुबूळ महात्मे आय बँकेला दान करण्यात आले.