नागपूर : नरखेड तालुक्यात शनिवारी झालेल्या विजांच्या तांडवात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय शिवारात बांधून असलेली बैलजोडी जागीच ठार झाली. शनिवारी दुपारी १.३० ते २ वाजताच्या दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या.योगेश रमेश पाठे (वय २७, रा. हिवरमठ), दिनेश ज्ञानेश्वर कामडी (३४), बाबाराव मुकाजी इंगळे (६०, दोघेही रा. मुक्तापूर) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.
हिवरमठ शिवारात दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास योगेश पाठे हा तरुण शेतात पेरणी करत असताना पाऊस सुरू झाला. त्यामुळे योगेश हा घरी जाण्यासाठी रस्त्यावर असलेल्या मोटारसायकलजवळ पोहोचला असता अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेशचे १० दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, तो मोठा भाऊ व आईसोबत राहत होता. त्याच्याकडे पाच एकर शेती आहे.
मुक्तापूर शिवारात शेतातील झोपडीत बसून असलेल्या दोन शेतकऱ्यांचा झोपडीवर वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याने दिनेश कामडी, बाबाराव इंगळे हे शेतात असलेल्या झोपडीत बसले होते. विजेचा कडकडाट सुरू असताना वीज झोपडीवर पडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दिनेशचे पाच महिन्यापूर्वी लग्न झाले होते.
दिनेश घरी का आली नाही म्हणून त्याचे वडील शेतात पाहायला गेले असता दोघेही त्यांना झोपडीत मृतावस्थेत आढळले. त्यांनी ही माहिती गावातील नागरिकांना दिली असता दोघांचाही वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे लक्षात आले. नरखेड पंचायत समितीच्या सभापती नीलिमा सतीश रेवतकर यांनी यासंदर्भात तहसीलदार डी. जी. जाधव यांना माहिती देत संबंधितांना त्वरित मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
पिंपळगाव येथे बैलजोडी ठारतालुक्यातील पिंपळगाव (राऊत) शिवारात भिष्णूर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी तीनच्या सुमारास वीज पडून बैलजोडी जागीच ठार झाली