लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धुळवडीच्या दिवशी तीन स्थानांवर भीषण आगी लागल्या. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. तीनही घटनांत आग लागल्याचे कारण स्पष्ट झाले नाही.
आगीची पहिली घटना सीए रोडवर सकाळी ८.३० वाजता घडली. येथील दोसर भवन चौकातील इकरा ऑटोमोबाईल शॉपमध्ये आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाची ८ वाहने घटनास्थळी पोहचले. आगीत दुकानातील किमान ७ लाख रुपयांचा माल जळून खाक झाला. दुसरी घटना सकाळी ९.३० वाजता एसटी विभागाच्या पार्सल कार्यालयात घडली. येथील आगीत पार्सलसह अन्य सामान जळून खाक झाले. तिसरी घटना दुपारी १२ वाजता काटोल रोड बोरगाव येथे घडली. येथील युनिकॉय ट्रेडिंग कंपनीच्या जिनिंग मिलला आग लागली. आगीची भहषणता लक्षात घेता वाडी नगर परिषद, कळमेश्वर, मोहपासह नागपूर महापालिकेच्य अग्निशमन पथकाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. कंपनी परिसरातील विहिरीच्या पाण्याचाही उपयोग आग विझविण्यासाठी करण्यात आला. रात्री आगीवर नियंत्रण मिळविले.
परंतु आगीची तीव्रता लक्षात घेता, मंगळवारीसुद्धा अग्निशमन पथक घटनास्थळी उपस्थित होते. अग्निशमन विभाग येथील आगीत किती नुकसान झाले, याचा अंदाज अजूनही बांधू शकले नाही.