लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहाराचा चौफेर विकास करताना उत्तर नागपूरचा विकास करण्यातही आम्ही मागे राहिलेलो नाही. या भागात आता तीन उड्डाणपूल निर्माण होणार आहेत. आतापर्यंत ९० हजार कोटी विकास कामांसाठी नागपुरात आणले. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.
केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत प्रस्तावित जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजप्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष विकी कुकरेजा, अशोक मेंढे आदी उपस्थित होते. या उड्डाणपुलासाठी ८० कोटी खर्च करण्यात येणार असून या पुलाची लांबी ७४० मीटर आहे.
इंदोरा चौक ते अग्रसेन चौक, अशोक चौक ते शीतलामाता मंदिर असा उड्डाणपूल निर्माण केला जाणार आहे. या कामाची किंमत ४४० कोटी आहे. पुढे डागा हॉस्पिटलजवळ उड्डाणपुलावर चढण्या-उतरण्यासाठी रॅम्पची तरतूद करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल अशोक चौकातून पुढे उमरेड रोडपर्यंत प्रस्तावित आहे.
शहरालगत केंद्रीय मार्ग निधीतून ४५०कोटींचा काँक्रीटचा रिंग रोड बांधला. त्यापुढे १२०० कोटींचा रिंग रोड पुन्हा घेण्यात आला आहे. आधी उत्तर नागपुरातून महाल भागात जाणे अडचणीचे होते. पण इटारसी उड्डाणपुलामुळे आता १०मिनिटात हे अंतर कापता येणार आहे. तसेच उत्तर नागपुरात सर्वात मोठा मॉल बनविण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले. सध्या मेट्रोच्या असलेल्या मर्यादा वाढवून कन्हान, बुटीबोरी, हिंगणा गावापर्यंत मेट्रो नेण्यात येईल. ब्रॉडगेज मेट्रोबाबत १५ दिवसात निर्णय होईल. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रात चांगल्या सोयीसुविधा शहरवासीयांना देण्याचा प्रयत्न केला आहे. मिहानमध्ये आलेल्या कंपन्यांमध्ये ५६ हजार तरुणांना आतापर्यंत रोजगार उपलब्ध झाला. येत्या २वर्षात १ लाख रोजगार उपलब्ध होतील.
प्रधामंत्री योजना, स्वच्छ भारत, शेतकऱ्यासाठी किसान रेल्वे, शहराला मुबलक पाणी, वीज अशा सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या सर्व कामांचे श्रेय जनतेचे आहे, असे गडकरी म्हणाले.