लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : पाेलिसांनी नागपूर-वर्धा मार्गावर नाकाबंदी करून स्काॅर्पिओची झडती घेतली. वाहनात ३.२४ किलाे गांजा आढळून येताच पाेलिसांनी चालकास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून स्काॅर्पिओ व गांजा असा एकूण ४ लाख ४१ हजार १७४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली. ही कारवाई शनिवारी (दि. ६) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
राजेंद्र उर्फ गुड्डू लखनसिंग जुनी (२८, रा. गोसाईनगर, वारंगा, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वाहनचालकाचे नाव आहे. बुटीबाेरी परिसरातून चारचाकी वाहनात गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी नागपूर-वर्धा मार्गावरील पेट्राेल पंपाजवळ नाकाबंदी करून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात पाेलिसांनी एमएच-३१/सीपी-७७८० क्रमांकाच्या गाडीची झडती घेतली.
दरम्यान, त्यांना या स्काॅर्पिओमध्ये ३.२४ किलाे गांजा आढळून आला. त्यामुळे त्यांनी स्काॅर्पिओचालक राजेंद्र यास अटक केली आणि त्याच्याकडून स्काॅर्पिओ, गांजा व दाेन माेबाईल हॅण्डसेट जप्त केले. या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ४१ हजार १७४ रुपये असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक आशिष मोरखडे, संजय बांते, सत्येंद्र रंगारी, राकेश तालेवार, पंकज ढोके, ओम राठोड, विनायक सातव, सुरेश दिवे यांच्या पथकाने केली.