नागपूर : आई-बाबा छोट्या-छोट्या कारणावर बोलतात, रागवतात निघूनच जाते या घरातून.. असे म्हणत तीन अल्पवयीन मुलींनी त्यांचे घर सोडले. व्हॉट्सॲपवर मिळालेल्या छायाचित्रावरून लोहमार्ग पोलिसांनी पालकांच्या रागावर घर सोडून जात असलेल्या तीन मुलींचा शोध घेतला. व मुलींना ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
आपल्या घरात दररोज काही न काही सुरुच असते. लहान-सहान गोष्टींवरुन आई-बाबा टोकत असतात, रागवतात. कसली रोजची कटकट म्हणत तिन मैत्रिणींनी आपलं घर सोड सोडण्याचे ठरवले. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत तीन अल्पवयीन मुलींनी पालकांच्या रागावर घर सोडले. १५, १६ आणि १७ वयोगटांतील या तिन्ही मुलींची चांगली मैत्री आहे. पालक लग्नासाठी नाद लावतात, कॉलेजमध्ये जाऊ देत नाहीत सतत बोलत असतात, या कारणामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.
घरी कोणालाच न सांगता त्या रेल्वेस्थानकावर पोहोचल्या व मिळेल त्या गाडीत बसून त्यांनी प्रवास सुरू केला. दरम्यान, रात्र होऊनही मुली घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. अखेर त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली.
नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा काशीद यांनाही कर्जत पोलिसांनी संपर्क साधून हरविलेल्या मुलींची माहिती दिली. तसेच त्यांना व्हॉट्सॲपवर छायाचित्र पाठविले. तीनही मुली विशाखापट्टणमला जात असल्याचे कर्जत पोलिसांनी सांगितले. विशाखापट्टणमला जाणारी गाडी दुपारी १.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचणार होती. त्यापूर्वीच लोहमार्ग पोलिसांनी या गाडीत शोधाशोध करून तीनही मुलींना गाडीतून उतरविले. त्यांची चौकशी केली असता मध्य प्रदेशात जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या तीनही मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.