व्हीआयपी रोडवरील घटना विकास मिश्र। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्हीआयपी रोडवर बुधवारी रात्री तीन हुल्लडबाज बाईकर्सने स्टंटबाजी करीत तासभर हैदोस घातला. त्यांच्या वाहनाची गती इतकी भीषण होती की, ते ज्या वाहनाजवळून जायचे त्याचा चालक हादरून जायचा. हे बाईकर्स अचानाक आपली गाडी मागच्या चाकावर उभी करून दूरपर्यंत स्टंट बाजी करीत जायचे. तासभर हा प्रकार सुरू होता. या हुल्लडबाज बाईकर्सला कुणी पोलीसवाला थांबवतो की काय हे पाहण्यासाठी या प्रतिनिधीने रस्त्यावर त्यांचा पाठलाग केला. हे बाईकर्स कधी ९० ते १०० किलोमीटर प्रति तासाने गाडी चालवायचे तर कधी एका चौकात गाडी थांबवून स्टंटबाजी करायचे त्यामुळे त्यांचा पाठलाग करणे शक्य होते. ही स्टंटबाजी करीत असताना डझनभर वाहनांशी धडक होता-होता राहिली. परिस्थिती इतकी नाजूक होती की एखाद्या कमजोर हृदयाच्या चालकास ‘हार्ट अटॅक’ आला असता. हा सर्व प्रकार चौकात तैनात असलेला पोलीस कर्मचारीही पाहत होता, परंतु त्याला याचे काहीच वाटत नव्हते. त्याच्यासाठी हे रोजचेच नाटक होते. विशेष म्हणजे हा रोजचाच प्रकार होता. आश्चर्य याचे की, परिसरात अनेक मोठे अधिकारी राहतात. त्यांनाही याची माहिती आहे. परंतु या हुल्लडबाज बाईकर्सला रोखण्याची कदाचित कुणामध्ये हिंमत नाही. ... ते तर थोडक्यात बचावले धरमपेठ हायस्कूलजवळ एक वृद्ध व्यक्ती, बहुदा मजूर असावेत. ते सायकलने जात होते. ते रस्त्याच्या एका बाजूने जात होते. तरीही त्यांच्या दोन्ही बाजूंनी दोन बाईकर्स इतक्या गतीने गेले की ते सायकलस्वार घाबरले आणि खाली पडले. ते खाली पडताच त्यांच्या मागून येणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना व कार चालकांना अचानकपणे जोरदार ब्रेक मारावा लागला. या हुल्लडबाज बाईकर्समुळे एक मोठा अपघात होता -होता वाचला. ते सायकलस्वार तर थोडक्यात बचावले. स्वत:ही मरणार, दुसऱ्यांचाही जीव घेणार या बाईकर्सला दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा तर नाहीच नाही पण ते स्वत:च्या मृत्यूची तयारी करीत आहेत. या बाईकर्सने ना हेल्मेट घातले होते ना ग्लब्स. रेसिंग बाईक लाखो रुपये या बाईकची किंमत असेल. त्यामुळे साहजिकच हे बिघडलेले तरुण कुण्या मोठ्या बापाचेच असतील. रस्त्यावर चालणारी सामान्य व्यक्ती घाबरत राहो, त्रस्त हो किंवा अपघातात जखमी झाली तरी चालेल पण पोलीस प्रशासनाला काय फरक पडतो. पोलिसांच्या गाडीसमोर हे बाईकर्स ट्रॅफिक तोडण्याचा नंगानाच तर करणार नाहीच. त्यामुळे त्यांना काय फरक पडणार? परंतु शहरातील सामान्य नागरिकांना सुरक्षित वाहतूक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. हे प्रकरण प्रसन्नता आणि अराजकतेचे आहे. त्यामुळे ते कायदा व सुव्यवस्थेचेही आहे. याची जबाबदारी शहरातील पूर्ण पोलीस विभागाची आहे. एक बाब आणखी - बाईकर्सच्या बाईकवर लिहिलेले नंबर कुणीही वाचू शकणे कठीण आहे. कारण एक तर त्यांच्या वाहनाची गती खूप असते. दुसरे म्हणजे त्यावरील क्रमांक हे फूल-पत्ती सारखे असतात.
तीन बाईकर्सचा तासभर हैदोस
By admin | Published: June 08, 2017 2:51 AM