नागपूर : वॉशरुमचे दार वाजवले म्हणून अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांना एका बारमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलीस आयुक्तांनी बारसंदर्भात अधिसूचना जारी केल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली आहे. आता पोलीस यासंदर्भात काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आदेश मेश्राम (२१, तिरोडा) असे तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. बुधवारी रात्री तो त्याचे मित्र लखन शेंडे व हर्षल जांगडेसोबत दिघोरी नाक्याजवळ जेवायला गेले होते. तिघेही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात राहतात. रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करत असताना ते जवळच असलेल्या कशिश बारमध्ये वॉशरुम शोधत शिरले. आदेश आत गेला असता वॉशरुमचा दरवाजा बंद होता. त्याने तो बंद दरवाजा वाजवला असता आतील व्यक्तीने आदेशला शिवीगाळ केली व बारच्या बाहेर तुला बघतो अशी धमकी दिली.
आदेश त्यानंतर बाहेर गेला असता त्याचे मित्र तेथे नव्हते. त्याने आत जाऊन पाहिले असता ३५ ते ४५ वयोगटातील तीन जण दोन्ही मित्रांना मारहाण करत होते. आदेशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालादेखील मारहाण करण्यात आली. कशीबशी तिघांनीही तेथून सुटका करवून घेतली. आदेशने त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठले व तीनही अज्ञात आरोपींविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.