नागपूर :कारचा दरवाजा नादुरुस्त होता. तो लॉक होत नसल्यामुळे व केवळ बाहेरूनच उघडल्या जात असल्याने कारच्या आत बंद झालेल्या तीन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. मृत्यूपूर्वी तीनही चिमुकल्यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी धडपड केली होती. कारच्या आत मिळालेल्या मुलांच्या बोटांच्या ठशांवरून ही बाब उजेडात आली आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी सायंकाळी ६:३० वाजता पाचपावली ठाण्यांतर्गत फारूखनगरमध्ये आलिया फिरोज खान (वय ६), तिचा भाऊ तौसिफ फिरोज खान (वय ४) आणि आफरीन इरशाद खान (वय ६) यांचे मृतदेह कारमध्ये आढळले होते. तिघेही १७ जूनला दुपारपासून बेपत्ता होते. ते बेपत्ता झाल्याचे समजताच १७ जूनला सायंकाळी सात वाजता कुटुंबीयांनी पाचपावली ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस आणि कुटुंबीय मुलांचा शोध घेत होते.
शहरात ठिकठिकाणी शोध घेतल्यानंतर मुलांचा काहीच पत्ता न लागल्याने पोलिसांनी बारकाईने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. यात मुले परिसरातून बाहेर गेली नसल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर रविवारी सायंकाळी सहा वाजता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकाऱ्यांसह जवळपास ५०० पोलिसांना घटनास्थळ परिसरात शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी फारूखनगरच्या कोनाकोपऱ्याची पाहणी केली. श्वान पथकाला बोलावले. अर्ध्या तासात पोलिसांना मुलांच्या घरापासून काही पावलांवर असलेल्या कारमध्ये त्यांचे मृतदेह आढळले.
प्राथमिक तपासात पोलिसांना मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे लक्षात आले आहे. सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मेयो रुग्णालयाच्या डॉक्टरांना विनंती करून रात्रीच तज्ज्ञांच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यास सांगितले. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आलेला नाही. परंतु प्राथमिक तपासात मुलांच्या मृतदेहावर कोणत्याच जखमेचे व्रण नसल्याचे आढळले. मृतदेहाची अवस्था पाहून गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.
कार (क्रमांक एमएच १९-बीजे ८१७४) मालक अशरफ असल्याचे सांगण्यात येत आहे. फारूखनगरचे भंगार व्यावसायिक सोहेल अंसारी यांनी डागडुजीसाठी ही कार आणली होती. सुरुवातीला ही कार गॅरेजच्या मागील भागात ठेवण्यात आली होती. मागील २० दिवसांपासून ही कार घटनास्थळी ठेवण्यात आली होती. कारचे दार लॉक नसल्यामुळे ते बाहेरून उघडले जाऊ शकत होते. मुलांना अखेरच्या वेळी दुपारी २:३० वाजता आलिया आणि तौसिफच्या आईने बघितले होते. त्यामुळे खेळता-खेळता मुले कारच्या आत गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
नागपूर हादरले, बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे कारमध्येच आढळले मृतदेह
कारचे दार न उघडल्यामुळे ते आत अडकून पडले. त्यांनी बाहेर पडण्यासाठी कारचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. कारच्या काचेवर आतून साचलेल्या धुळीवर त्यांच्या बोटांच्या ठशावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. मुले काचही खाली करू शकले नाही. आतून आणि बाहेरून धूळ साचल्यामुळे आणि काचांवर ब्लॅक फिल्म लावलेली असल्यामुळे मुले आत असल्याचे कोणालाही कळले नाही.
पायदानावर मिळाले मृतदेह
कडक उन्हात कार खूप गरम झाली होती. या अवस्थेत तज्ज्ञांनुसार कारच्या आत कार्बन मोनाक्साईड गॅस तयार होतो. कारच्या आत अडकल्यामुळे मुलांचा जीव गुदमरला आणि ते बेशुद्ध झाले व पायदानावर पडले.
दोन-तीन दिवसांत येणार अहवाल
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात मुलांचा जीव गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर पोलिस सर्व दृष्टिकोनातून तपास करीत आहेत. पोलिसांनी अनेक प्रकारची तपासणी केली आहे. दोन-तीन दिवसांत त्याचा अहवाल मिळणार असून, त्यानंतर ठोस कारण पुढे येईल. अमितेश कुमार यांनी कोणाच्या बेजबाबदारपणामुळे घटना झाली नसल्याचे सांगितले. त्यांच्या मते कार बेजबाबदारपणे पार्क करणे किंवा त्याकडे लक्ष न देण्याचा तपास करण्यात येऊन दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.