नागपूर :विदर्भात गेल्या दोन दिवसांमध्ये पुराच्या पाण्यात बुडून आणि वाहून जाण्याच्या विविध घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेतील चार ते पाच तालुक्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. रविवारी पुरात वाहून गेलेल्या ट्रकमधील तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. जिकडेतिकडे पूरस्थिती असल्याने पुलांवरून पाणी वाहत असून, अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
शनिवारी एका लाईनमनचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे माॅर्निंग वाॅक करण्यासाठी गेलेला तरुण पुरात वाहून येणारी लाकडे पकडण्याच्या प्रयत्नात वाहून गेला. गोंदियालगत कारंजा येथे शेतातील खदानीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यात एक इसम रविवारी सकाळी नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला.
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते भामरागड मार्गावरील पेरमिली नाल्याचे पाणी शनिवारी पुलावरून वाहत होते. रात्री १० वाजेच्या सुमारास चालकाने त्या स्थितीतही पुलावरून ट्रक पुढे नेण्याचा प्रयत्न केला; पण अंधारात चालकाचा अंदाज चुकला आणि ट्रक नाल्यात कोसळला. पुराच्या पाण्यासोबत तो काही अंतर वाहत गेला. या ट्रकमध्ये ५ ते ६ जण असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मध्यरात्री पोलीस आणि महसूल प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळविताच राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाने (एसडीआरएफ) शोधमोहीम राबविली. त्यात रविवारी सकाळी पती-पत्नीसह एका मुलीचा मृतदेह हाती लागला. त्यात सीताराम बिच्चू तलांडे (५० वर्षे), सम्मी सीताराम तलांडे (४५ वर्षे, दोघे रा. कासमपल्ली, ता. अहेरी) आणि पुष्पा नामदेव गावडे (१४ वर्षे, रा. मोकोला, ता. भामरागड) या तिघांचा समावेश आहे.
पुरात वाहून आलेली लाकडे पकडणे जीवावर बेतले
धारणीनजीकच्या दिया येथे माॅर्निंग वाॅक करण्यासाठी गेलेला तरुण पुरात वाहून येणारी लाकडे पकडण्याच्या प्रयत्नात वाहून गेला. रविवारी सकाळी ही घटना घडली. त्याचा शोध घेण्यासाठी अमरावती येथून शोध व बचाव पथक दाखल झाले आहे. शांतीलाल लखन कासदेकर (३५) हा रविवारी सकाळी ८.३० वाजता सिपना नदीचा पूल ओलांडून समोर असलेल्या उतावल्ली गावाकडे फिरायला निघाला होता. सिपना नदीच्या पुरात मोठमोठी लाकडे येत असल्याचे पाहून शांतीलालने ती लाकडे पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पुराचे पाणी अचानक पुलावर आले. त्यात शांतीलाल वाहून गेला. हे दृश्य पाहणाऱ्या काहींनी मदतीसाठी ग्रामस्थांना बोलावले. परंतु तोपर्यंत तो खूप दूरवर वाहून गेला. माहिती मिळताच राजकुमार पटेल व तहसीलदार प्रदीप शेवाळे घटनास्थळी दाखल झाले. आमदार पटेल यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी संपर्क साधल्यानंतर बचाव पथकाने शोध चालवला आहे.
खदानीत बुडून दोन बालकांचा मृत्यू
गोंदिया शहरालगत ग्राम कारंजा येथे शेतातील खदानीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला. वंश जयप्रकाश उपराडे (८) व पवन विजय गाते (९, दोन्ही रा. भद्रूटोला, कारंजा) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही शनिवारी खदानीत पोहण्यासाठी गेले होते. जयप्रकाश रामप्रसाद उपराडे (३६, रा. भद्रूटोला, कारंजा) यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील नोकारी बु. येथील संजय राजाराम कंडलेवार (५०) हा इसम रविवारी सकाळी ९ वाजता नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला.