लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरीच्या पैशाची रक्कम साथीदाराला देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादातून तिघांनी आपल्या एका साथीदारावर लाकडी दांड्याने हल्ला करून त्याला ठार मारले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा चौकाजवळ सोमवारी पहाटे २ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली. सुनील ऊर्फ नवा ज्ञानेश्वर शेंडे (वय ३०) असे मृताचे नाव आहे.संतोष सुभाष येवले ( वय ३०), अशोक श्यामराव गोंदुळे (वय २५) आणि उमेश श्यामराव झाडे (वय ३०) अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नंदनवन झोपडपट्टीतील गल्ली नंबर ५ मध्ये राहतात. मृत सुनील आणि तीनही आरोपी चोरट्या वृत्तीचे असल्याने त्यांचे आपसात पटत होते. ते सोबतच राहायचे. रविवारी दुपारी सुनील ऊर्फ नवा याला बरे वाटत नसल्याने आरोपी संतोष येवलेने सुनीलला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले होते. तेथील डॉक्टरांचे लक्ष नसल्याचे पाहून सुनीलने हॉस्पिटलच्या काऊंटरमधून पैसे चोरले. तेथून घरी परतल्यानंतर त्यांनी मटण आणि दारू विकत घेतली. सुनीलने त्याच्या आईला मटण बनवायला सांगितले आणि आरोपी संतोषने, अशोक गोंदुळे, उमेश झाडे यांनाही पार्टी करू म्हणून बोलावून घेतले. त्यानंतर सुनील, संतोष, अशोक आणि उमेश हे चौघे इकडे तिकडे फिरून मध्यरात्रीपर्यंत दारू पीत बसले. रात्री २ च्या सुमारास ते संतोषच्या रूमवर गेले. तेथे ते मटणावर ताव मारू लागले. अचानक दुपारी चोरलेल्या पैशाचा मुद्दा चर्चेला आला. त्यातील रक्कम मागताच सुनीलने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपी संतापले. त्यांनी सुनीलला मारहाण सुरू केली. सुनीलनेही तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे आरोपी अशोक आणि उमेशने त्याला पकडून ठेवले तर संतोष येवले याने घरातील लाकडी दांडा उचलून त्याच्या डोक्यावर फटके मारणे सुरू केले. त्यामुळे संपूर्ण खोलीत रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. हे थरारक दृश्य पाहून आरोपी संतोषची आई ओरडू लागली. त्यामुळे आरोपींनी सुनीलला फरफटत रस्त्यावर नेले आणि तेथे त्याची हत्या केली. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांना जाग आली. त्यामुळे एकाने पोलिसांना फोन केला. माहिती कळताच नंदनवन पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. सुनीलचा मृतदेह मेडिकलमध्ये रवाना करण्यात आला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.आज सकाळी ही घटना चर्चेला येताच परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. ठाणेदार संदीपान पवार, पीएसआय अजय जाधव यांनी आरोपींच्या खोलीतून रक्ताने माखलेले कपडे तसेच इतर साहित्य जप्त केले. पुढील तपास सुरू आहे.ती ओरडत होती, आरोपी मारत होतेया घटनेची साक्षीदार मुख्य आरोपी संतोष येवलेची आई ताराबाई ही आहे. तिने आपल्या मुलाच्या तावडीतून मृत सुनीलला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र आरोपींनी तिलाही धक्का देऊन बाजूला केले आणि सुनीलला ठार मारले. तिने केलेल्या आरडाओरडीमुळेच शेजारच्यांना आणि नंतर पोलिसांना ही घटना माहीत पडली.
नागपुरात तिघांनी साथीदाराला ठार मारले : चोरीच्या पैशाचा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 9:03 PM
चोरीच्या पैशाची रक्कम साथीदाराला देण्यास नकार दिल्यामुळे झालेल्या वादातून तिघांनी आपल्या एका साथीदारावर लाकडी दांड्याने हल्ला करून त्याला ठार मारले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शारदा चौकाजवळ सोमवारी पहाटे २ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
ठळक मुद्देओल्या पार्टीत उडाला भडका