लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने कृषी पंप वीज धोरणाचा लाभ ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांचे थकीत वीज बिल माफ करण्यात आले आहे. अजून १७ लाख ७४ हजार १९२ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची कार्यवाही सुरू आहे. यातील ४५ हजारावर शेतकरी विदर्भातील आहेत. ऊ
र्जामंत्री नितीन राऊत यांनी मार्चपासून या योजनेला सुरुवात केली. त्याअंतर्गत ४४ लाख ४३ हजार २४७ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची संधी आहे. या शेतकऱ्यांवर ४५,७७९ कोटी २६ लाख रुपये रुपये बिल थकीत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांचे विलंब शुल्क व व्याजातही सूट मिळणार आहे. ही सूट १५,९४९ कोटी ९० लाखाची आहे.
राज्यात ३ लाख १४ हजार २५५ शेतकऱ्यांनी थकीत ५० टक्के व वर्तमानात आलेले वीज बिल भरून थकीत वीज बिलातून मुक्त झाले आहेर. या शेतकऱ्यांकडे ८९९ कोटी ७९ लाख रुपये थकीत होते. ५८४ कोटी ७० लाख रुपये त्यांनी भरले. ४४९ कोटी ९३ लाख रुपये त्यांचे माफ करण्यात आले. अशाच प्रकारे राज्यातील १२ लाख ७४ हजार १९२ शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या शेतकऱ्यांनी चालू बिलाचे १२८९ कोटी २ लाख रुपये भरले आहे. या शेतकऱ्यांना आता थकीत असलेल्या बिलाची ५० टक्के रक्कम ३१ मार्च २०२२ पर्यंत भरायची आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय निदेशक विजय सिंघल यांनी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.
- सर्वाधिक शेतकरी पुण्यातील
योजनेचा लाभ घेणारे सर्वाधिक १ लाख ६४ हजार ८१३ शेतकरी पुणे विभागातील आहेत. कोकण विभागातील ८९,४२२ शेतकरी आहेत, तर विदर्भातील ४५,७५२ शेतकरी यात आहेत. औरंगाबाद विभागातील १४,२६८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.