ट्रान्सपोर्ट कार्यालयात हात साफ : निजामाबाद येथून घेतले ताब्यात कामठी : खैरी शिवारातील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयातून तीन लाख रुपये रोख चोरून नेणाऱ्या चोरट्यास कामठी (जुने) पोलिसांनी आंध्र प्रदेशातील निजामाबाद येथून ताब्यात घेत अटक केली. चोरीची ही घटना शनिवारी (दि. १८) दुपारी उघडकीस आली. छोटू असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी अमृतपालसिंग सरदारजितसिंग अलग, रा. नागपूर हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, त्यांचे खैरी शिवारात एच. एन. आर. नामक कार्यालय आहे. त्यांनी कार्यालयातील ड्रॉवरमध्ये शुक्रवारी (दि. १७) तीन लाख रुपये ठेवले होते. शनिवारी दुपारी ही रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी कामठी (जुने) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत ही चोरी छोटूने केल्याची शक्यता व्यक्त केली व त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. छोटू हा अमृतपालसिंग यांच्याकडे क्लिनर म्हणून काम करायचा. छोटू नावाशिवाय त्यांच्याकडे त्याची कोणतीच ओळख नव्हती. घटनेच्या दिवशी एमएच-३१/सीबी-९०२५ क्रमांकाच्या ट्रकला बुकिंग नसल्याने हा ट्रक कार्यालयासमोर उभा होता आणि छोटू या ट्रकच्या केबिनमध्ये झोपला होता. शनिवारपासून छोटूही बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. परिणामी, पोलिसांनी या ट्रकच्या ठावठिकाणाची माहिती घेतली. त्यातच छोटू या ट्रकमध्ये वाडी परिसरातून निघून गेल्याची तसेच ट्रकचालक तेलगूमध्ये बोलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे कामठी (जुने) पोलिसांचे पथक छोटूच्या शोधात आंध्र प्रदेशाकडे रवाना झाले. या पोलिसांनी त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. दरम्यान, तो निजामाबाद जिल्ह्यातील अरमुरी भागात गवसला. पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या छोटूला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देताच अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ लाख ७० हजार रुपये रोख जप्त करण्यात आला असून, उर्वरित ३० हजार रुपये त्याने खर्च केल्याचे पोलिसांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
तीन लाखांची रोकड पळविणाऱ्यास अटक
By admin | Published: February 22, 2017 2:54 AM