लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ८० लाखांचा कर माफ करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या एका कर संग्राहक तसेच कंत्राटी सुपरवायझरला एसीबीच्या पथकाने आज जेरबंद केले. कर संग्रहक सुरज सुरेंद्र गणवीर (रा. भंडारा मोहल्ला, इंदोरा) आणि सुपरवायझर रविंद्र भाऊराव बागडे (रा. गणेश नगरी अपार्टमेंट कोराडी) अशी त्यांची नावे आहेत. जरीपटका येथील रामचंद्र जेठाणी यांचे आसीनगर झोन मध्ये गंगोत्री रीसॉर्ट अँड लॉन आहे. आरोपी गणवीर आणि बागडे या दोघांनी संगणमत करून ७ एप्रिलला जेठाणी यांना करासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यानंतर २८ एप्रिलला त्यांनी ८० लाखाचा मेमो दिला. कोरोनामुळे वर्षभरापासून लॉन बंद असल्याच्या स्थितीत आहे. अशात एवढ्या प्रचंड रक्कमेचा कर निर्धारित केल्यामुळे जेठानी यांनी गणवीर आणि बागडेशी संपर्क साधला. त्यांनी हा कर माफ करण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली. सद्यस्थिती आणि आर्थिक स्थितीचा हवाला देऊन तेवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे जेठाणी म्हणाले. त्यामुळे आरोपी तीन लाख रुपयांच्या लाचे वर आले . लाच दिल्यास संपूर्ण प्रकरण मार्गी लावू, असेही गणवीर आणि बागडेने जेठाणीना सांगितले. त्यापेक्षा एक रुपया कमी चालणार नाही, असेही म्हटले. एवढी मोठी लाच देण्याची इच्छा नसल्याने आज सकाळी एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची भेट घेतली. त्यांना तक्रार देऊन गणवीर आणि बागडेच्या त्रासातून सोडण्याची विनंती केली. अधीक्षक नांदेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून लगेच तक्रारीची शहानिशा करून घेतली. तक्रार खरी असल्याने लाचेचा सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेठाणी यांनी त्यांच्या हेमू कॉलनी चौकातील निवास्थानी आरोपींना लाचेची रक्कम घेण्यासाठी बोलावले. तेथे रक्कम हाती घेताच एसीबीच्या पथकाने गणवीर आणि बागडेच्या मुसक्या बांधल्या. या कारवाईची माहिती महापालिकेत कळताच एकच खळबळ उडाली
कार्यालय आणि निवासस्थानाची झडती
या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने गणवीर आणि बागडेच्या घरी तसेच कार्यालयात झडती सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर त्यात काय मिळाले, हे स्पष्ट झाले नव्हते. अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक विनोद आडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
मोठे रॅकेट सक्रिय
कराची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवून नंतर सेटलमेंटच्या नावाखाली संबंधित व्यक्तीकडून मोठी रक्कम उकळण्याचा गोरख धंदा गेल्या अनेक दिवसापासून महापालिकेच्या कर विभागात सुरू आहे. त्यासाठी एक रॅकेटच सक्रिय आहे. एसीबीच्या पथकाने कसून चौकशी केल्यास या प्रकरणात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.