मौदा : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबरोबर मृत्यूची संख्या वाढत आहे. मात्र आजही ग्रामीण भागात अंगावर ताप काढणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यासोबतच खासगी डॉक्टरांकडे जाऊन घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर तातडीने चाचणी करणाऱ्यांचे प्रमाणही कमीच आहे. याच कारणामुळे ग्रामीण भागात मृत्यूदर वाढताना दिसतो आहे. मौदा तालुक्यातील गोवरी येथे गिरेपुंजे कुटुंबातील तीन सदस्यांचा चार दिवसात मृत्यू झाल्याने सध्या गावात चिंतेचे वातावरण आहे.
गोवरी येथील शेतकरी रामदास गिरेपुंजे (६८) यांना पाच मुले व मुलगी असून सर्व विवाहित आहेत. ४ एप्रिल रोजी तिसरा क्रमांकाचा मुलगा राजू रामदास गिरेपुंजे (४२) यांना सर्दी, खोकला जाणवताच भंडारा येथील खासगी रुग्णालयात जाऊन उपचार सुरू केला. त्याचप्रमाणे मोठा मुलगा क्रिष्णा रामदास गिरेपुंजे (५२) यांनीही भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात चाचणी करून उपचार सुरू केला. परंतु क्रिष्णा यांचा १८ एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच्या दोन दिवसानंतर २० एप्रिल रोजी राजूचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा धक्का बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी (दि. २१) रोजी वडील रामदास यांचाही मृत्यू झाला.