नागपूर : गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सूचना देऊनही मीटर रीडिंगमधील अचूकतेसाठी सुधारणा न केल्याने विदर्भातील तीन मीटर रीडिंग एजन्सीजना ताबडतोब बडतर्फ करण्यात आले, तर संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मीटर रीडिंगसंदर्भात मंगळवारी आढावा बैठक घेण्यात आली होती. महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी या बैठकीतच संबंधित एजन्सींना बडतर्फ करण्याची कारवाई केली. यापूर्वी राज्यातील ५२ एजन्सीवर कारवाई करण्यात आली होती, हे विशेष.
ग्राहकांना विजेच्या वापराप्रमाणेच अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यासाठी मीटर रीडिंग हा बिलिंगचा आत्मा आहे. महावितरणकडून वीज मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारींमध्ये मोठी घटदेखील झाली आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यात यावी. वारंवार सूचना देऊनही अचूक रीडिंगसाठी सुधारणा न झाल्यास मीटर रीडिंग एजन्सी व जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा संजय ताकसांडे यांनी यावेळी दिला.
यावेळी कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी उपस्थित होते. मुख्य अभियंता संजय पाटील (देयके व महसूल), सुनील देशपांडे (चंद्रपूर), दिलीप दोडके (नागपूर), अनिल डोये (अकोला), पुष्पा चव्हाण (अमरावती), राजेश नाईक (गोंदिया), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, तसेच अधीक्षक अभियंते उपस्थित होते, तसेच विदर्भातील सर्व कार्यकारी अभियंता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.