नागपूर : उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे दावे किती पोकळ आहेत, याची परत एकदा रविवारी पोलखोल झाली. २४ तासांत तीन हत्यांची प्रकरणे उघडकीस आली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मजुराचा, तर यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्हेगाराचा भर चौकात खून झाला, तर १२ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ट्रकचालकाची हत्या झाल्याची बाब त्याचा कुजलेला मृतदेह सापडल्याने समोर आली.
चारित्र्याबाबत अपशब्द काढल्याने झालेल्या वादातून एका महिलेने तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने एका मजुराची हत्या केली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी व मृत हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. महेशकुमार उईके (३०) असे मृताचे नाव आहे, तर राजकुमारी (३५) व करण उईके (३०) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी व मृत हे नारा परिसरात राहायचे. शनिवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास तिघेही झोपडीसमोरील मोकळ्या जागेत दारू पीत बसले होते. दरम्यान, महेशने राजकुमारीच्या चारित्र्याबाबत अपशब्द काढले व तिचे करणसोबत प्रेमसंबंध असल्याचे वक्तव्य केले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. महेशने तिला मारहाण केली व खाली ढकलले. डोक्याला मार लागल्याने राजकुमारी जखमी झाली. हे पाहून करण संतापला. त्यानंतर करण आणि राजकुमारी यांनी महेशला मारहाण करण्यास सुरुवात केली.
राजकुमारीने काठीने, तर करणने रॉडने डोके फोडले. महेश बेशुद्ध पडला. यानंतर राजकुमारीने जरीपटका पोलिस ठाणे गाठले. साथीदाराने मारहाण केल्याने डोक्याला मार लागल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, तिने महेशच्या दुखापतीबाबत माहिती दिली नाही. जरीपटका पोलिसांनी राजकुमारीला मेयो रुग्णालयात पाठवले. पहाटे ३:०० वाजता नारा परिसरात गस्त घालणाऱ्या पथकाला दोन महिला दिसल्या. त्यांच्याजवळ चौकशी केली असता महेश जखमी झाल्याचे त्यानी सांगितले. पोलिसांनी तत्काळ महेशला मेयो रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजकुमारीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी करणचा शोध सुरू केला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. त्यानंतर राजकुमारीलाही ताब्यात घेण्यात आले. महेश नागपुरात एकटाच राहत होता. जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला आहे.
सहकाऱ्यांनी ट्रकचालकाला संपविले आणि ट्रकच चोरला
कपिलनगर येथून बेपत्ता झालेल्या ट्रकचालकाची लुटून हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मागील १२ दिवसांपासून संबंधित ट्रकचालक बेपत्ता होता. काटोल नाक्याजवळ ट्रकचालकाचा मृतदेह आढळल्याने त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याच सहकाऱ्यांनी त्याची हत्या केली. मेहबूब प्यारे खान (४७, कामगारनगर) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. ८ ऑगस्ट रोजी तो कळमना बाजारातील ट्रकमध्ये हरभरा व इतर माल घेऊन अमरावती जिल्ह्यातील वरुडच्या दिशेने गेला होता. त्याच्यासोबत मुख्तार बेग व लाला उर्फ छोटेलाल निशान हे दोघे होते.
मेहबूब तेथून कळमना बाजारात नवीन माल घेऊन येणार होते. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना फोनदेखील केला व कुठे आहात, असे विचारले. कळमेश्वरजवळ पोहोचलो असून, काही वेळात जेवायलाच घरी येतो, असे मेहबूब यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. मेहबूब बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी १० ऑगस्ट रोजी कपिलनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. वरुड पोलिस ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान वरुड पोलिसांनी मुख्तार आणि लाला यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी मेहबूबची हत्या केल्याची बाब कबूल केली. कळमेश्वरनंतर मुख्तार व लालाने मेहबूब यांना ट्रक थांबवायला लावला. त्यानंतर त्यांनी त्यांना लुटले व हत्या केली. त्यानंतर ट्रक बाजारात नेऊन हरभरा विकला व पळ काढला. खून केल्यानंतर आरोपींनी मेहबूबचा मृतदेह काटोल नाक्याजवळील झुडपात फेकल्याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित घटनास्थळावर जाऊन मृतदेहाची शोधाशोध केली असता कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठविला आहे.
भर चौकात गुन्हेगाराची हत्या
रविवारी सायंकाळी यशोधरानगर येथील कांजी हाऊस चौकात गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना घडली. बादल पडोळे (३८, पारडी) असे मृतकाचे नाव आहे. रविवारी दुपारपासून बादल कांजी हाऊस चौकात घिरट्या घालत होता. सायंकाळी सहा वाजता न्यू मंगळवारी रहिवासी गुन्हेगार चेतन सूर्यवंशी तेथे आला. चेतनसोबत दोन - तीन तरुण होते. चेतनचा बादलसोबत काही गोष्टीवरून वाद झाला. दरम्यान, चेतनने बादलवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात बादल गंभीर जखमी झाला व त्याने तेथून स्वत:ला सोडवत कसातरी काही अंतरापर्यंत पळ काढला. मात्र, त्यानंतर तो खाली कोसळला.
घटना घडली त्यावेळी कांजी हाऊस चौकात मोठी गर्दी होती. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बादलला तातडीने रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. २०१९ साली बादलवर पाचपावली येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता. रात्री उशिरापर्यंत पोलिस चेतन आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत होते.