नागपूर : शहर बस संचालन पारदर्शी व प्रभावी करण्यासाठी महापालिकेने नवे आॅपरेटर नियुक्त करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे या वेळी एका आॅपरेटरऐवजी तीन आॅपरेटर नेमले जाणार आहेत. इथेनॉलवर आधारित ग्रीन बससाठी वेगळी कंपनी नियुक्त केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आॅक्टोबर २०१६ पर्यंतचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत.नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या तीन आॅपरेटर्सला महापालिकेकडे असलेल्या बसचे समान वितरण केले जाईल. याशिवाय आॅपरेटरला स्वत:ही ठरवून दिलेल्या बस खरेदी कराव्या लागतील. महापालिकेकडे जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मिळालेल्या २३७ बस आहेत. यापैकी १६८ बस रस्त्यांवर धावत आहेत. ६९ बस दुरुस्तीसाठी बंद आहेत. बस संचालनासाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या असता कंत्राटदारांनी संपूर्ण शहरातील बस संचालनासाठी इच्छा दर्शविली नाही. त्यामुळे तीन पॅकेजमध्ये निविदा काढण्यात आल्या. या अंतर्गत नियुक्त होणाऱ्या प्रत्येक आॅपरेटरला जेएनएनयूआरएम अंतर्गत मिळालेल्या ७९ सुरू असलेल्या व २३ बंद असलेल्या बस दिल्या जातील. याशिवाय प्रत्येक आॅपरेटरला ५० मिडीबस व १५ मिनीबस स्वत: खरेदी कराव्या लागतील. तिन्ही आॅपरेटला मिळून एकूण १५० मिडीबस व ४५ मिनीबसची व्यवस्था करावी लागेल. शहर बस संचालनासाठी पाच कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. यात दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती येथील कंपन्या आहेत. यापैकी तीन कंपन्यांची नियुक्ती केली जाईल. सद्यस्थितीत वंश निमय इन्फ्राप्रोजेक्टकडे शहर बस संचालनाचा कंत्राट आहेत. मात्र, नागपुरातील शहर बस सेवा दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. बसची स्थितीही दयनीय झाली आहे. वंश निमय व महापालिकेदरम्यान रॉयल्टीच्या मुद्यावर २००८ पासून वाद सुरू आहे. यामुळेच नव्या आॅपरेटरची नियुक्ती करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आयबीटीएम आॅपरेटरसाठी प्रतिसाद नाही शहर बस आॅपरेटवर नियंत्रण ठेवण्यासोबतच बसची स्थिती, टिकेटिंग, आर्थिक परिस्थिती आदीवर लक्ष ठेवण्यासाटी १५० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली इंटिग्रेटेड बस ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट (आयबीटीएम) आॅपरेटरची नियुक्ती करायची आहे. दोन वेळा आॅपरेटरच्या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आॅपरेटरची यासाठी नियुक्ती करावयाची असल्यामुळे अडचणी जात आहेत. जनतेच्या हितासाठी निर्णयनागरिकांचे हित विचारात घेता शहर बससेवा उत्तम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता तीन पॅकेजमध्ये बस आॅपरेटर नियुक्त करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे जनतेचा फायदा होईल. लवकरच तिन्ही आॅपरेटरची नियुक्ती केली जाईल. - बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती, मनपा
शहर बससाठी तीन नवे आॅपरेटर
By admin | Published: July 05, 2016 2:38 AM