रामटेक/कळमेश्वर : काेराेना संक्रमण हळूहळू कमी हाेत आहे. जिल्ह्यात रविवारी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये रामटेक तालुक्यात तीन तर कळमेश्वर तालुक्यात काेराेनाचे दाेन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले.
रामटेक तालुक्यात तीन नवीन रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील एकूण काेराेनाबाधित रुग्णांची संख्या ८५४ झाली आहे. यातील ७७० रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, ३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये रामटेक शहरातील महात्मा फुले वाॅर्डमधील दाेघे तर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली. कळमेश्वर तालुक्यात दाेन नवीन रुग्णांची भर पडली आहे. दाेन्ही रुग्ण ग्रामीण भागातील असून, शहरात एकाही रुग्णाची नाेंद करण्यात आली नाही. नवीन रुग्णांमध्ये तालुक्यातील तिष्टी व तेलकामठी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.