कमलेश वानखेडे
नागपूर : बाजार समितीच्या निवडणुकीत रामटेकमध्ये काँग्रेसचे तीन तुकडे झाले आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आशिष जयस्वाल यांनी येथे भाजपला दूर ठेवत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक असलेले जि. प. सदस्य दुधाराम सव्वालाखे यांच्या गटाशी हातमिळवणी केली आहे. या ‘सहकार’ गटाला टक्कर देण्यासाठी भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी काँग्रेसकडून विधानसभा लढलेले गज्जू यादव यांच्यासह प्रहार व गोंडवाना या पक्षांना सोबत घेतले आहे, तर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी असलेले सचिन किरपान यांनीही आपला वेगळा गट मैदानात उतरविला आहे. आपल्यालाही केदार यांचे समर्थन असल्याचा या गटाचा दावा आहे, तर पारशिवनीमध्ये आमदार जयस्वाल व भाजप एकत्र येत केदार गटाला टक्कर देत आहेत.
जिल्ह्यात सावनेर, उमरेड, कुही-मांढळ, भिवापूर, रामटेक, मौदा, पारशिवनी या सात बाजार समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या सातही बाजार समित्यांवर १२ ते १४ महिन्यांपासून प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या बाजार समित्या एकदाच्या ताब्यात घेण्यासाठी नेते निवडणुकीची वाट पाहत होते. या निवडणुकीवरून पुन्हा एकदा काँग्रेस व भाजपमध्ये सामना होत आहे. निवडणूक होऊ घातलेल्या सातपैकी सहा बाजार समित्या काँग्रेसच्या ताब्यात होत्या. फक्त उमरेड बाजार समिती भाजपच्या ताब्यात होती. आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा माजी मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे, तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माजी मंत्री सुनील केदार यांच्या गटाने सावनेर बाजार समितीच्या सर्व १८ जागा बिनविरोध करीत काँग्रेसने विजयाचे खाते उघडले आहे. यापूर्वीसुद्धा सावनेर या बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व होते.
उमरेडमध्ये पारवे विरुद्ध पारवे सामना
- उमरेड, भिवापूर व कुही-मांडळ या बाजार समित्यांमध्ये काँग्रेसचे आमदार राजू पारवे विरुद्ध भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांच्यात सामना रंगणार आहे. भाजपने सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात उमरेड बाजार समिती जिंकली होती. यावेळी ही बाजार समिती खेचण्यासाठी आमदार राजू पारवे यांनी सूत्रे सांभाळली आहेत. कुही-मांढळ व भिवापूर या बाजार समित्यांवर सभापती बसविण्यात काँग्रेसला यश आले होते. पण, एकतर्फी बहुमत नव्हते. त्यामुळे यावेळी येथील चित्र काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नेत्यांची स्वारी शेतकऱ्यांच्या दारी
- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. महाराष्ट्र शासनाच्या नव्या नियमानुसार बाजार समितीच्या या निवडणुका होत आहेत. यामध्ये ज्याच्या नावाने सातबारा उतारा असेल, तो शेतकरी मतदान करू शकणार आहे. त्यामुळे मतदार असलेल्या शेतकऱ्याचे मत मिळविण्यासाठी सर्वच नेते शेतकऱ्यांच्या दारी पोहोचत आहेत. तालुका स्तरावर जोरात मेळावे सुरू आहेत.
असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक
- सावनेर : बिनविरोध केदार गट (काँग्रेस)
- रामटेक : २८ एप्रिल मतदान आणि २९ एप्रिल मतमोजणी
- पारशिवनी : २८ एप्रिल मतदान आणि २९ एप्रिल मतमोजणी
- कुही-मांढळ : २८ एप्रिल मतदान आणि २९ एप्रिल मतमोजणी
- मौदा : ३० एप्रिल मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी
- भिवापूर : १३ मे मतदान आणि १४ मे मतमोजणी
- उमरेड : १३ मे मतदान आणि १४ मे मतमोजणी