लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवून दोन वासरांना चिरडले होते. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. त्या मुलाला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या दोन युवकांना पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तक्रार मिळताच तीन पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली.शनिवारी बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सुरेश आठवले, सुधीर गुडधे आणि ज्ञानचंद दयाप्रसाद यादव यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री १० वाजता १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवून रस्त्याच्या काठाने बसलेल्या गाईच्या दोन वासरांना धडक दिली. यात दोन्ही वासरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी कार चालक मुलाला पकडून ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. परंतु अल्पवयीन मुलाच्या मदतीसाठी सारंग आणि कीर्तीकुमार नावाचे दोन कार्यकर्ते प्रतापनगर ठाण्यात पोहोचले. या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी विनाकारण मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने पोलीस ठाण्यात जाऊन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यानंतर डीसीपी विवेक मसाळ यांनी तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने मुख्यालयात बदली केली.