नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या लाकडीपूल येथील पोलिस चौकीत पत्ते खेळणाऱ्या तीनही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शहरातील गुन्हेगारी कारवायांमुळे अगोदरच नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच पत्त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा आणखी खराब झाली आहे. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतर या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आनंद काळे, फिरोज शेख व रवी करदाते अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहे.
लाकडीपूल येथील गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पोलिस चौकीत हा प्रकार पहायला मिळाला. दुपारी १२ वाजल्यापासून चौकीच्या मागील भागात बांधलेल्या टीन शेडखाली तीन पोलिस कर्मचारी टेबलावर पत्ते खेळू लागले. याची माहिती बाहेरच्या काही लोकांना मिळाली. या कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ काढण्यात आला व तो व्हायरल झाला. पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी या कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले. पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, वाहतूक पोलिसांचे डोके फोडणाऱ्या लकडगंज पोलिस ठाण्यातील मद्यधुंद पोलिस हवालदारावरदेखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आदित्य ठाकूर हा लकडगंज पोलिस ठाण्यात बीट मार्शल होता. सक्करदरा ट्रॅफिक झोनमध्ये तैनात हर्षद वासनिक हे शनिवारी रात्री भांडे प्लॉट येथे नाकाबंदीवर होते. पहाटे ३ वाजता वासनिक ड्यूटी आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. मद्यधुंद अवस्थेत आदित्यने वासनिक यांना मारहाण केली. वासनिक यांच्या तक्रारीवरून ठाकूरविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत झोन तीनचे उपायुक्त गोरख भामरे यांनी आदित्य ठाकूरला निलंबित करण्याचे निर्देश दिले.