लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यातील पेंच नदीवरील पिपळा, गरंडा व वाघोडा घाटात रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याचे कळताच खणीकर्म महामंडळाचे अध्यक्ष आ. आशिष जयस्वाल व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी गुरुवारी (दि. १६) दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाड टाकली. त्यांना घाटात रेतीचा उपसा सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी तिन्ही घाटांचे चित्रीकरण ते सील केले.
खणीकर्म महामंडळाचे अध्यक्ष आ. आशिष जयस्वाल यांची वाघाेडा (ता. पारशिवनी) येथे गुरुवारी दुपारी सभा आयाेजित केली हाेती. या सभेत ते नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतानाच त्यांना पेंच नदीवरील पिपळा, गरंडा व वाघोडा रेतीघाटात माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचे तसेच त्या रेतीच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्था झाल्याचेही काही नागरिकांनी आ. आशिष जयस्वाल यांना सांगितले.
परिणामी, त्यांनी लगेच तहसीलदार प्रशांत सांगडे यांना साेबत घेत या तिन्ही घाटांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांना घाटात रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचे तसेच पिपळा घाटात दाेन ड्रेसर बाेट, गरंडा घाटात एक पाेकलॅण्ड मशीन आढळून आली तर वाघाेडा घाटात काहीही आढळून आले नाही. त्यांनी या तिन्ही घाटांचे चित्रीकरण करून ते सील केले.
....
आधीच लागली कुणकुण
रेतीघाटांमधून रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याबाबत आ. आशिष जयस्वाल यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली आहे. त्यामुळे ते घाटाची पाहणी करण्यासाठी येऊ शकतात, अशी कुणकुण रेती तस्करांना लागली हाेती. त्यामुळे त्यांनी घाटांमधील पाेकलॅण्ड मशीन व ट्रक आधीच हलविले हाेते. परिणामी, त्यांना वाघाेडा घाटात काहीही आढळून आले नाही. या घाटालगतच्या सपाट जागेवर झुडपात एक पाेकलॅण्ड मशीन आढळून आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.
...
जप्तीविना कारवाई
या कारवाईमध्ये खणीकर्म व महसूल विभागाने काेणतेही वाहन अथवा साहित्य जप्त केले नाही. केवळ तिन्ही घाट व घाटांच्या परिसरात असलेल्या रेतीसाठ्याचे चित्रीकरण करण्यात आले. अंधार झाल्यानेे पुढील कारवाई करणे शक्य झाले नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात शुक्रवारी (दि. १७) पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात पाेलिसातही तक्रार करण्यात आली नव्हती.
...
पिपळा, वाघोडा व गरंडा या घाटात मोठ्या प्रमाणात मशीनच्या साहाय्याने अवैध रेती उपसा केला जात असल्याचे आढळून आले. घाटाच्या परिसरात मोठा रेतीसाठा आढळून आला. या घाटांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे निदर्शनास आले. पाच कि.मी.च्या आत रेतीसाठा करण्यात येऊ नये, असा नियम असताना रेतीसाठा आढळून आला.
- आशिष जयस्वाल,
...
आमदार तथा अध्यक्ष खणीकर्म महामंडळ. खणीकर्म महामंडळाचे अध्यक्ष आ. आशिष जयस्वाल यांच्यासाेबत घाटांची पाहणी करण्यासाठी गेलाे असता पिपळा व गरंडा घाटात पाेकलॅण्ड मशीन आढळून आल्या. ते दाेन्ही घाट सील करण्यात आले. वाघाेडा घाटाची चाैकशी केली जाईल.
- प्रशांत सांगडे,
तहसीलदार, पारशिवनी.
...