लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे साठी तीन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक ०२०३६ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल रेल्वेगाडी ६ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी नागपूरवरून सायंकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी पुण्याला सकाळी ९.०५ वाजता पोहोचेल.
रेल्वेगाडी क्रमांक ०२०३५ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी ७ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सायंकाळी ५.४० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता नागपूरला पोहोचेल. दोन्ही गाड्यांना अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्यात १ एसी टु, ६ एसी थ्री, ११ स्लिपर आणि ४ सेकंड क्लास सीटिंग कोच राहणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.