बाबा टेकाडे
सावनेर : सावनेर तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नागरिकांची आरोग्य सेवा प्रभारी अरोग्य अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे. विविध आरोग्य केंद्राला नानाविध समस्यांनी ग्रासल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो लोक उपचाराविना आहे. गोरगरीब लोकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे अवघड असते. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालय एकमेव आशेचा किरण असतो. या रुग्णालयात विविध व्याधीवर उपचार होतील अशी आशा बाळगून रुग्ण आणि त्याचे नातेवाईक धावपळ करत प्राथमिक रुग्णालयात येतात. मात्र त्यांची निराशा होते. विविध तपासण्याची व्यवस्था येथे नाही. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपलब्ध सुविधेनुसार थातूमातूर प्राथमिक उपचार करुन रुग्णाला सावनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाते. याही रुग्णालयाच तशीच स्थिती असल्याने येथील डॉक्टर रुग्णाला नागपूरला रेफर करतात.
सावनेर तालुक्यात खापा, केळवद, पाटणसावंगी, बडेगाव, खापरखेडा आणि चिचोली असे पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सावनेर तालुक्यातील कुणालाही शासकीय रुग्णालयात प्रसुतीकरिता सीझरची व्यवस्था नाही. प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर तथा सर्जरी साहित्य उपलब्ध नाही. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ पाच बेडची व्यवस्था आहे.
पारशिवनी तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत वाघ यांचेकडे सावनेरचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. ते दोन्ही तालुक्याचा कार्यभार बघत आहेत. कनिष्ठ सहायक मनोहर नागपुरे यांच्याकडे सावनेर केळवद आणि कळमेश्वर अशा तीन ठिकाणचा कार्यभार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रिक्त पदे कंसात गावे आणि लोकसंख्या अशी -
बडेगाव- ५ (३८) २२८१९, केळवद-८ (२९) २९,८५५, पाटणसावंगी- ८ (२७) ४९०३५, खापा- ५ (१९) ३१९७६, चिचोली ३ (१२) ५९६०३ एवढ्या मोठ्या संख्येच्या लोकांच्या आरोग्याची जवाबदारी असलेल्या विभागात तब्बल २९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. यामुळे अन्य कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला आहे.