नागपूर : कोरोना काळात सर्वांच्या शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘फिट इंडिया’ मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातून या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद मात्र अत्यंत निराशाजनक आहे. जिल्ह्यातील ३७१६ शाळांपैकी केवळ ५७४ शाळांनीच सहभाग नोंदविला आहे. खेळांकडे पाहण्याचा समाजाचा आणि शाळांचा दृष्टिकोन अत्यंत उदासीन असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या ३७१६ शाळा आहेत. सर्वच शाळांनी फिट इंडियामध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष परिस्थिती तशी नाही. या अभियानासाठी फेब्रुवारी महिन्यापासून मोहीम सुरू झाली आहे. पण या मोहिमेत नोंदणी करण्यासाठी क्रीडा शिक्षकांच्या बैठका क्रीडा विभागाने अथवा शिक्षण विभागाने घेतल्या नाहीत. शाळांना पत्र पाठविले पण त्याचे महत्व मुख्याध्यापकांना कळले नाही. या अभियानात नोंदणी करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत होती. नोंदणी अत्यल्प झाल्याने ती मुदत २७ डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा क्रीडा विभागाने सर्व शाळांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांनाही पत्र पाठविले आहे. त्यात नोंदणी न करणाऱ्या शाळांकडून खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहे. पण लॉकडाऊनमध्ये अनेक शाळा बंद आहे. शाळांमध्ये शिक्षकांची ५० टक्केच उपस्थिती आहे. अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक राहिलेला नाही. त्याचा फटका फिट इंडिया अभियानाला बसला आहे.
दृष्टिक्षेपात
एकूण शाळा - ३७१६
नोंदणी - ५७४
- या आहेत अडचणी
१) स्कूल का मेल आयडी क्लर्कला माहिती असते. मुख्याध्यापकही त्यावरच अवलंबून असतो. नोंदणी करताना ओटीपी मेलवर येतो. बहुतांश वेळा बरेच प्रयत्न केल्यानंतर ओटीपी येतो. त्यासाठी क्लर्क अथवा मुख्याध्यापक बसून असणे गरजेचे आहे. सध्या ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती असल्याने कधी मुख्याध्यापक, कधी क्लार्क तर कधी क्रीडा शिक्षक नसतो.
२) प्रायव्हेट स्कूलमध्ये लॉकडाऊनमध्ये बहुतांश स्कूलने क्रीडा शिक्षकांना काढले आहे.
३) चार वर्षापूर्वी क्रीडा शिक्षकाचे पद व्यपगत केले होते. क्रीडा शिक्षकाला विषय शिक्षकात समाविष्ट केले. ज्या शाळेची पटसंख्या ५०० वर संख्या आहे. तिथेच क्रीडा शिक्षक आहे. इतर शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नाही.
- शारीरिक शिक्षकांची पदेच कमी केली ५०० च्यावर पटसंख्या असेल तरच शारीरिक शिक्षक ठेवला आहे. शाळांमध्ये क्रीडा शिक्षकच नसल्यामुळे दुसरा विषय शिक्षक हे कसा करेल, मुख्याध्यापक एका शिक्षकाला हे काम सोपवून देतात. त्यामुळे क्रीडा संदर्भात फारसे गांभीर्याने घेतले जात नाही.
भारत रेहपाडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती
- आम्ही नोंदणीसाठी सर्व बीईओंच्या बैठकी घेतल्या. त्यांना नोंदणी करण्यासंदर्भात आवाहनही केले आहे. नोंदणी अत्यल्प झाल्याने मुदतही वाढविण्यात आली आहे. नोंदणी न केलेल्या शाळांकडून आम्ही खुलासाही मागणार आहोत.
अविनाश पुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी