लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात एकीकडे विकासकामे सुरू असताना पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी त्रिस्तरीय वृक्षारोपण योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेतून ही योजना राबविण्यात येत असून, यात मनपासह विविध संस्थांचा सहभाग आहे.
शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आणि रस्ता दुभाजकांवर गेल्या वर्षापासून वृक्षारोपण केले जात आहे. त्रिस्तरीय पद्धतीने वृक्षारोपणाची ही योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या स्तरावर २ फूट उंचीच्या झाडाचे रोपण केले जात असून, वेगवेगळ्या जातींची ही झाडे आहेत. दुसऱ्या स्तरावर विविध प्रकारची फुलझाडे लावली जात असून, ज्या ऋतुत ज्या झाडांना फुले येतात अशा झाडांची निवड करून झाडे लावण्यात येत आहेत. त्यामुळे वर्षभर झाडांना फुले येत असल्याचे दिसेल. तिसऱ्या स्तरात रस्त्याच्या कडेला ८ ते १० फूट उंचीची झाडे लावण्यात येत आहेत. विविध प्रकारच्या फळझाडांचा यात समावेश असून, ही निवड वनस्पती तज्ज्ञांनी केली आहे.
या झाडांना मोकाट जनावरे खाऊ शकणार नाहीत व कोणतेही नुकसान पोहोचवू शकणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. नागपूरच्या २७ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडवर १९ विविध प्रजातींची झाडे लावली जात आहेत. शहरातील शुष्क वातावरण पाहता या वातावरणाचा सामना करणारे व कमी पाण्यात जगणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वृक्षारोपणातून लागवड करण्यात येणाऱ्या या झाडांना नाग नदीचे जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी देण्यात येणार आहे.
कचरा प्रकल्पांतील खत वापरणार
शहरातील कचरा आणि भांडेवाढ येथील कचऱ्याच्या प्रकल्पातील खत झाडांना देण्यात येईल. तसेच शहरातील १२ तलावांमधून निघणारी सुपिक मातीही या झाडांना पोषण म्हणून देण्यात येईल.