सुमेध वाघमारे नागपूर : उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत आहे. याचा परिणाम शरीरावर होत असून मागील तीन दिवसांत उष्माघाताचा तीन मृत्यूची नोंद झाली. परंतु मनपाच्या आरोग्य विभाग याकडे उष्माघाताचे संशयित मृत्यू म्हणून पाहत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच याची पुष्टी करणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘हीट एग्जशन’ म्हणजे, उष्णता ग्रस्त होणे. ही एक अशी अवस्था आहे ज्याचा लक्षणांमध्ये शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम निघतो आणि पल्स रेट वाढतो. उन्हाळ्यात खूप जास्त तापमानाच्या संपर्क आल्यावर अशी लक्षणे दिसून येतात. उन्हाळ्यात दिसून येणाºया तीन ‘सिंड्रोम्स’ पैकी हे एक आहे. यासोबत ‘हिट क्रॅम्प्स’ आणि ‘हीट स्ट्रोक’ही (उष्माघात) आढळून येतात. यात उष्माघात सर्वात घातक ठरतो. मागील चार दिवसांतील नागपूरचे तापमान ४२ ते ४३ अंशाच्या दरम्यान आहे. यामुळे दिवसा घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाकडे मागील तीन दिवसांत तीन संशयित उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली. यातील दोन रुग्ण मेडिकलच्या पसिरात मृतावस्थेत आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू हा गांधीबाग झोन परिसरात झाला. यातील एका मृताची ओळख पटली असून तो जाटतरोडी येथील रहिवासी आहे. उर्वरीत दोन मृताची ओळख पटलेली नाही. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनाला पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालावरूनचा त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
-उष्माघाताची लक्षणे रखरखत्या उन्हात कठोर शारीरिक श्रम करण्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. याची लक्षणे अचानक किंवा हळहळूही समोर येऊ शकतात. यात खूप घाम येणे, चक्कर येणे, थकावट वाटणे, उभे राहिल्यावर रक्तदाब कमी होणे, मासपेशी आकडणे, मळमळ वाटणे आणि डोकेदुखी ही प्रमुख लक्षणे आहेत.
-कोणाला धोका होऊ शकतो?उष्माघात कोणालाही होऊ शकतो. परंतु चार वर्षांपेक्षा छोट्या मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना हा आजार धोकादायक ठरू शकतो. कारण छोट्या मुलांमध्ये शरीराचे तापमान सामान्य करण्याची क्षमता विकसीत झालेली नसते तर ज्येष्ठांमध्ये औषधे आणि विविध आजारांमुळे उष्णता सहन करण्याची आणि शरीराला त्यानुरुप तयार करण्याची प्रक्रिया कमजोर पडलेली असते.