सूज आल्यानंतर मलमही लावला तक्रार देण्यास परावृत्त केले बजाजनगर चौकातील घटनानागपूर : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तीन तरुणांना अंबाझरी पोलिसांनी बेदम मारहाण केली. जबर जखमी झाल्यामुळे त्या तरुणांना दोषी पोलिसांनी मलमही लावला आणि हे प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळताच सदर तरुण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हातपाय जोडून आपल्याविरुद्ध तक्रार न देण्याची मनधरणी केली. एवढेच नव्हे तर हे प्रकरण एका सिक्युरिटी एजन्सीच्या कर्मचाऱ्यावर ढकलून पोलिसांनी स्वत:ला दूर ठेवण्यात यश मिळवले. घटना रविवारी रात्रीची आहे. बजाजनगर चौकातील एका सावजी हॉटेलमध्ये अंशुल विश्वकर्मा, कृष्णा द्विवेदी आणि सुरेंद्र विश्वकर्मा हे वेटर म्हणून काम करतात. ते मूळचे मध्य प्रदेश(रिवा)मधील रहिवासी आहेत. याच भागात राहणाऱ्या एका मित्राला घरी सोडण्यासाठी ते गेले. परत येताना बजाजनगर चौकाजवळच्या एका लेडिज होस्टलच्या गेटसमोर या तिघांना पोलिसांनी थांबवले. कोण आहात, कुठून आला, कुठे चालला, अशी विचारणा केल्यानंतर पोलिसांनी आपल्या वाहनात बसवून त्यांना अंबाझरी ठाण्यात नेले. तेथे त्यांना कुख्यात गुन्हेगारांसारखे रात्रभर चोपण्यात आले. बेदम मारहाणीमुळे या तरुणांच्या सर्वांगावर सूज आली. ते पाहून पोलिसांनी त्यांना मलम लावला. त्यानंतर सकाळी सोडून दिले. पीडित तरुणांनी श्रीकांत नामक हॉटेल मालकाला ही माहिती दिली. त्यांनी या तिघांना डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात दाखल केले. सर्वांग हिरवेनिळे पडल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. दरम्यान, या प्रकरणाचा बोभाटा झाला. त्यामुळे दोषी पोलिसांवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढला. प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळाल्याने हादरलेल्या अंबाझरी पोलिसांनी या तरुणांना तसेच त्यांची मदत करणाऱ्यांना हातपाय जोडणे सुरू केले. आमची नावे घेऊ नका, आम्ही ज्या सिक्युरिटी एजन्सीच्या कर्मचाऱ्याने आम्हाला याची माहिती दिली, त्याच्यावर गुन्हा नोंदवतो’, असे सांगितले.(प्रतिनिधी)पोलिसांशी दुश्मनी, नको रे बाबाहॉटेलचा धंदा असल्यामुळे पोलिसांशी दुश्मनी घेण्याचा विचार सोडून पीडित तरुणांच्यावतीने धावपळ करणाऱ्या तरुणाने पोलिसांची आर्जव मान्य केली. त्यानंतर जय मल्हार सिक्युरिटी एजन्सीचा सुपरवायझर सुनील धुरडे याच्याविरुद्ध तरुणाला मारहाण करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. रात्री ९.४५ वाजेपर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक झाली नव्हती. या तरुणांना मारहाणीमुळे जबर दुखापत झाली तर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. पिनाक दंदे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. सिक्युरिटीवालाही दोषीया प्रकरणात सिक्युरिटी एजन्सीवाला सुनील धुरडेही तेवढाच जबाबदार आहे. तो माजी सैनिक असून, त्यानेच पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले. हे तरुण लेडिज होस्टेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते, अशी माहिती दिली. त्यानेच प्रारंभी या तरुणांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दिली. दरम्यान, वरिष्ठांच्या कानावर हा संतापजनक प्रकार गेल्यामुळे त्याचे ‘परिणाम’ मंगळवारी उघड होण्याची शक्यता संबंधित वर्तुळात आहे.
तीन तरुणांना पोलिसांकडून मारहाण
By admin | Published: February 02, 2016 2:34 AM