नागपूर : मुलीवरून सुरू असलेल्या वादातून उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या ‘आरपीटीएस’ मार्ग परिसरात भरदिवसा एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ऐनवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी चालकाने त्याला लिफ्ट दिल्याने तरुणाचे प्राण वाचले. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व यामुळे खळबळ माजली होती.
सागर नागले (२५, सुदामनगरी, पांढराबोडी) असे जखमीचे नाव आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असून एका मुलीवरून त्याचा काही तरुणांशी वाद सुरू होता. बुधवारी दुपारी त्याचा मित्र रोहित वरठी हा सागरच्या घरी आला व दोघेही सुरेंद्रनगर येथील ‘आरपीटीएस’जवळ आले. यावेळी आदित्य इंगोले, व त्याचे दोन साथीदार एका अपार्टमेंटजवळ उभे होते. दोघांशी बोलत असताना त्यांनी तेथील गार्डला अगोदर नाश्ता व नंतर चहा आणण्यासाठी पाठविले. गार्ड तेथून गेल्यावर त्यांनी सागरवर तलवारीने वार केला. यात त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
जीव वाचविण्यासाठी सागरने पळ काढला. रस्त्यावरून पळत असताना एका दुचाकी चालकाने त्याला ‘लिफ्ट’ दिली व बजाजनगर पोलीस ठाण्यात सोडले. पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी नेले. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त चिन्मय पंडित व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंह राजपूतदेखील पोहोचले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरठीची चौकशी करण्यात आली. सागरविरोधातदेखील याअगोदर मारहाणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. वार करणारे तीनही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.