लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुतेक देशांच्या सीमाभागात आपसातील घडणाऱ्या युद्धाने जगाचा इतिहास रंगला आहे. प्रत्येक देशाचा सैनिक आपल्या देशासाठी प्राणपणाने लढतो. पण हे युद्ध होतात की राजकीय व आर्थिक फायद्यासाठी तिसऱ्याच शक्तीद्वारे घडविले जाते, हे गूढच आहे. युद्धामागचा हा छुपा अजेंडा आणि त्याच्या भीषणतेवर भाष्य करणाऱ्या ‘पिकनिक’ या एकांकिकेने रंगभूमी महोत्सवाची उत्साही सुरुवात झाली.राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था व मेराकी थिएटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून उत्तर अंबाझरी मार्ग येथील राष्ट्रभाषा भवनात रंगभूमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहायक संचालक अलका तेलंग, ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू, विजय दम्माणी तसेच राष्ट्रभाषा परिवारचे अध्यक्ष राजाराम शुक्ल व सचिव सुरेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे औपचारिक उद््घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी पिकनिक आणि ‘रिहर्सल’ या दोन एकांकिकांचा प्रयोग झाला.जगात देशांच्या सीमाच राहिल्या नाहीत, कुणी कधीही एकमेकांच्या देशात येऊ-जाऊ शकेल आणि युद्धच झाले नाही तर, हा संदेश देणाऱ्या पिकनिकने दर्शकांना खिळवून ठेवले. नाटकाचे लेखक वृंदावन दंडवते तर दिग्दर्शन दिवंगत प्रकाश लुंगे यांनी केले आहे. अभिजित आठवले, स्नेहा खंडारे, अक्षय गेडाम, रोशन झोडे, अभिलाष यादव व ओमकार लांडगे यांनी भूमिका साकारल्या. गणेश नायडू यांनी महोत्सवासाठी हे नाटक बसविले. महोत्सवाची दुसरी एकांकिका ‘रिहर्सल’ व्हीएमव्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांद्वारे सादर झाली. ओमप्रकाश आदित्य यांचे लेखन आणि अपर्णा लखमापुरे यांचे दिग्दर्शन असलेल्या या हास्यव्यंगात्मक नाटकातून वैद्यकीय क्षेत्रातील काळ्या कारभारावर भाष्य केले आहे. जुही बलबुडे, सत्यजीत हिरेखां, शांतनु सोनी, तनय महाधुले, आरती सरोदे, कीर्ती सोनवानी, हिमानु हटवार, निर्मिती जीवनतारे, कार्तिक राव, गौरव राऊत यांनी भूमिका साकारल्या. श्रद्धा ढोबळे, सौरभ बुलखे, करिश्मा मेश्राम, सोनम विश्वकर्मा, विनोद शाहू, कौशिक शर्मा लोकनाथ गंगभावीर यांचे सहकार्य होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘दर्प’ आणि ‘गुड अॅन्ड बेस्ट’ या एकांकिकांचे प्रयोग झाले. या नाटकांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. रविवारी ज्योती जोगी लिखित आणि वेदांत रेखाडे दिग्दर्शित ‘श्री गणेशा’ तसेच सदत हसन मंटो लिखित आणि ऋतुजा वानखेडे दिग्दर्शित ‘पेशावर से लाहोर तक’ या एकांकिकांद्वारे या महोत्सवाची सांगता होणार आहे.‘फर्स्ट बेल ऑन स्टेज’ या उपक्रमाद्वारे नवोदित नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांना त्यांच्या पहिल्यावहिल्या सादरीकरणासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याचा उद्देश ठेवून राष्ट्रभाषा परिवार आणि मेराकी थिएटर कार्य करीत असून हे रंगकर्मी भविष्यातील नागपूरची रंगभूमी घडवतील, असे मनोगत तरुण रंगकर्मी रूपेश पवार यांनी व्यक्त केले.
‘पिकनिक’मधून युद्धाच्या छुप्या अजेंड्यावर भाष्य : रंगभूमी महोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:10 AM
बहुतेक देशांच्या सीमाभागात आपसातील घडणाऱ्या युद्धाने जगाचा इतिहास रंगला आहे. प्रत्येक देशाचा सैनिक आपल्या देशासाठी प्राणपणाने लढतो. पण हे युद्ध होतात की राजकीय व आर्थिक फायद्यासाठी तिसऱ्याच शक्तीद्वारे घडविले जाते, हे गूढच आहे. युद्धामागचा हा छुपा अजेंडा आणि त्याच्या भीषणतेवर भाष्य करणाऱ्या ‘पिकनिक’ या एकांकिकेने रंगभूमी महोत्सवाची उत्साही सुरुवात झाली.
ठळक मुद्देमेराकी थिएटर-राष्ट्रभाषा परिवारचे आयोजन