नागपूर : शहरातील मुख्य डाकघरात एका टोळीने ५०-५० हजार रुपये घेऊन युवकांना नोकरी लावण्याची बतावणी केल्याची बाब उघड झाल्यानंतर, हे ठगबाज सोमवारी पुन्हा काही बेरोजगारांची मुलाखत घेणार असल्याचे उघड झाले. परंतु त्यांना पूर्वीसारखे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही.
जीपीओ कार्यालयात ३ मार्चला ब्रँच सर्व्हिस ऑपरेटर पदाचे नियुक्तीपत्र घेऊन पोहोचलेल्या ३ कथित उमेवादारांकडून या फसवणुकीचा उलगडा झाला. डाक विभागात ब्रँच सर्व्हिस ऑपरेटरचे पदच नसल्याची सत्यस्थिती आहे. त्यावेळी डाक विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी तपास केला असताल परिसरात जवळपास २० ते २२ युवकांची मुलाखत घेण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सायंकाळी उशिरा विभागाच्या वतीने सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. परंतु या प्रकरणात आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी जीपीओमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११.३० वाजता जीपीओच्या मुख्य द्वारावर पोलीस अधिकाऱ्यांचे वाहन होते. काही पोलीस तेथे उभे होते. सूत्रानुसार यावेळी आजूबाजूला त्याच प्रकारे मुलाखत होणार असल्याची चर्चा होती.
............