नागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने सुमारे दोन हजार ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना फसविणारा कुख्यात ठग रामचंद्र मदारी कटकमवार (वय ६२) याला विविध गुन्ह्यांमध्ये कमाल पाच वर्षे कारावास व एकूण २६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. सुनील पाटील यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
कटकमवार खरे टाऊन, धरमपेठ येथील रहिवासी आहे. त्याने सीताबर्डीतील अशोका सुरक्षा ठेव कंपनीत रक्कम गुंतविण्याकरिता रविनगर येथील फिर्यादी रमेश रॉय यांच्याकडून ४ लाख ९५ हजार ५०० रुपये घेतले होते. मुदत संपल्यानंतर व्याजासह ६ लाख ४० हजार १८५ रुपये परत करण्याचे आश्वासन रॉय यांना देण्यात आले होते. परंतु, कटकमवारने रॉय यांना रक्कम परत केली नाही. त्यामुळे रॉय यांनी कटकमवारविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर अनेक पीडित गुंतवणूकदार पुढे आले. दरम्यान, आरोपीने सुमारे दोन हजार ठेवीदारांना ३ कोटी ५२ लाख ८५ हजार ६०० रुपयांनी फसविल्याचे तपासात आढळून आले. कटकमवारला १४ मार्च २००२ रोजी अटक करण्यात आली.