नागपूर : राज्य सरकारने वाढत्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लावले. लॉकडाऊनमध्ये गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांची उपासमार होऊ नये म्हणून शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. १ मेपासून मोफत धान्याचे वितरण करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहे. पण धान्य वितरणात ई-पॉस मशीनचा मोठा खोडा आहे. मशीनवर शिधापत्रिकाधारकांना अंगठा लावायचा आहे. पण शिधापत्रिकाधारकांचा अंगठा, कोरोनाचा धोका वाढविणार अशी भीती रेशन दुकानदारांना आहे. कोरोना काळात पॉस मशीनवरील धान्याचे वितरण बंद करावे, अशी मागणी सातत्याने रेशन दुकानदार करीत आहेत. परंतु शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागपूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने लॉकडाऊन लावले. त्यावेळी रेशन दुकान अनेक कुटुंबीयांसाठी आधार ठरले. तेव्हाही अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सरकारने ५ किलो धान्य मोफत वाटले. आता राज्य सरकारने लॉकडाऊन लावले आहे. गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत धान्य वितरण होणार आहे. सरकारने पुन्हा १५ दिवस लॉकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या पोटापाण्याची सोय मोफत धान्य देऊन केली आहे. नागपूर जिल्ह्यात १३०० रेशन दुकाने आहेत. नागपूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी धान्याच्या वितरणास नकार दिला आहे. गेल्या वर्षभरात अनेक दुकानदार पॉझिटिव्ह आले आहे. काहींचा मृत्यूही झाला आहे. त्याला पॉस मशीन कारणीभूत असल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने दुकानदारांना नॉमिनी करून द्यावे अशी मागणी रेशन दुकानदार संघटनांची आहे.
शिधापत्रिकाधारक
ग्रामीण
अंत्योदय - ७७,०७८
प्राधान्य - ३,१५,०८२
शहर
अंत्योदय - ४४,६८८
प्राधान्य - ३,३१,७६६
- रेशन वितरण करणार नाही
आम्ही १ मे रोजी ई-पॉस मशीन पुरवठा कार्यालयात जमा करणार आहोत. आम्ही वर्षभरापासून सरकारकडे रेशन दुकानदारांना पॉस मशीनद्वारे डीलर नॉमिनी करून द्यावी अशी मागणी करीत आहोत. त्याचबरोबर आम्हालाही विमा कवच द्यावे, अशी आमची मागणी आहे. पण शासनाचे लक्षच नाही. त्यामुळे आजपासून रेशन वितरण करणार नाही.
गुड्डु अग्रवाल, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघ
- अजून मोफत धान्याची उचल व्हायची आहे
मे महिन्याच्या नियमित धान्याची उचल करण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता. मोफत धान्याची उचल १ मे पासून करणार होतो. पण १ मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने एफसीआयला सुटी असते. दुसऱ्या दिवशी रविवार आला आहे. त्यामुळे सोमवारनंतरच उचल होईल. शिवाय केंद्र सरकारकडून पॉस मशीनमध्ये धान्याचे फीडिंग व्हायचे आहे. रेशन दुकानदारांकडून संपाचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात विभागाच्या सचिवांसोबत व्हीसी झाली. राज्य सरकार रेशन दुकानदारांच्या मागणीसंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करीत आहे. त्यावर सकारात्मक निर्णय होईल. विभागाचीही रेशन दुकानदार संघटनांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी धान्य वितरणास सकारात्मकता दर्शविली आहे. असे काही होणार नाही, धान्याचे वितरण सुरळीत होईल.
रोहिणी पाठराबे, शहर पुरवठा अधिकारी