गायकवाड यांना प्रदेशाध्यक्षांना काढण्याचा अधिकार नाही : राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांचे स्पष्टीकरण
ऑनलाइ लोकमत
नागपूर, दि. १८ - रिपाइं (आ) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड यांनी केली. परंतु राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पद केवळ नामधारी असून त्यांना प्रदेशाध्यक्षांना काढण्याचा अधिकारच नाही, प्रदेशाध्यक्षांना केवळ राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय महासचिव हेच काढू शकतात, त्यामुळे थुलकर यांचे निलंबन अवैध आहे. आपण त्यांच्या पाठीशी आहोत, असे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. पाटील हे रिपाइं (आ) चे संस्थापक सुद्धा आहेत, हे विशेष.
डॉ. मोहनलाल पाटील यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ) ची स्थापना आपण भोपाळ येथे केली आहे. कंसातील आ म्हणजे आठवले नसून आंबेडकर असे आहे. महाराष्ट्रातील रिपाइं नेत्यांच्या भांडणाला कंटाळून आपण भोपाळमध्ये या पक्षाची स्थापना केली. आपण स्वत: रामदास आठवले यांच्या नेतृत्वात काम केल्याने पुढे त्यांनाच या पक्षाचे नेतृत्व करायला दिले. आजही या पक्षाचे राष्ट्रीय कार्यालय भोपाळ हेच आहे. आपण संस्थापक असल्याने आपल्याला पक्षाच्या कार्यपद्धतीची पूर्ण माहिती आहे. कार्याध्यक्ष हे पद केवळ नामधारी असते. त्यांना प्रदेशाध्यक्षांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीला काढण्याचा अधिकार नाही. सुमंतराव गायकवाड हे पक्षाचे सन्माननीय नेते आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते फारसे सक्रिय नाही. सध्या कार्याध्यक्ष हे उत्तमराव खोब्रागडे आहेत. त्यामुळे ते थुलकर यांना काढू शकत नाही तसेच ज्या कारणांसाठी थुलकर यांना काढण्यात आल्याचे सांगितले जाते, त्यासंदर्भात थुलकर यांनी दिलेल्या खुलाशाने आपले समाधान झाले आहे. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर आपला पपूर्ण विश्वास आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, भीमराव बन्सोड, दुर्वास चौधरी, भाऊराव मस्के, आर.एस. वानखेडे उपस्थित होते
मी प्रदेशाध्यक्षपदी कायम
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वत: कार्यकर्त्यांना अपेक्षित जागा मिळाल्या नाही, त्यामुळे नाराजी असली तरी युती कायम असल्याचे जाहीर केले आहे. मी पुणे येथे असताना त्यांच्याशी फोनवर चर्चा केली, तेव्हा युती कायम असून प्रचार करण्याचे त्यांनी स्वत: आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार मी केवळ पुण्यातील युतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे पत्रक काढले. त्यामुळे त्यांच्याच आदेशानुसार मी काम केल्याने ते मला पक्षातून कसे काढणार. पक्षातील काही दुखावलेल्या लोकांचे हे कृत्य आहे. आठवले यांनी तसे कुठलेही आदेश न दिल्याने मी प्रदेशाध्यक्षपदी कायम आहे. काही गैरसमज झाला असेल तर आठवले यांच्याशी भेट घेऊन ते दूर करण्यात येईल.
भूपेश थूलकर प्रदेशाध्यक्ष, रिपाइं(आ.)