नागपूर : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तिकिटासाठी दावेदारांची मोठी यादी आहे. अनेक जण मोठ्या नेत्यांकडे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत, तर बरेच लोक ‘बायोडाटा’ सादर करत आहेत. मात्र, पक्षाकडे सर्वांचीच कुंडली आहे. मागील पाच वर्षांतील कामगिरीच्या आधारावरच एखाद्याला तिकीट द्यायचे की नाकारायचे हे ठरविण्यात येईल, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिले.नागपुर येथे संकल्प मेळाव्यात दोघाही राष्ट्रीय नेत्यांनी विदर्भातील भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, राज्य प्रभारी सरोज पांडे, यांच्यासह विदर्भातील मंत्री, आमदार, खासदार, उपस्थित होते.पक्षाकडून काही तरी मिळालेच पाहिजे ही अपेक्षा न बाळगता कार्यकर्त्यांनी विचारधारेवर कायम राहून काम केले पाहिजे, असे जे.पी.नड्डा म्हणाले. कलम ३७० च्या आडून जम्मू-काश्मीरला देशापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू होता. कॉंग्रेसचे नेतेदेखील यात सहभागी होते, असा आरोपदेखील त्यांनी केला.
''विधानसभेसाठी ‘बायोडाटा’ नव्हे, कामगिरीवरच तिकीट''
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 5:31 AM